गरोदर असल्याची लक्षणे?pregnancytips.in

Posted on Tue 8th Nov 2022 : 10:29

आपण गर्भवती आहोत हा विचार करण्यास भाग पाडणारी अनेक कारणे असू शकतात. मासिक पाळी न येणे किंवा लांबणे, गर्भनिरोधक गोळी घेण्यास विसरणे किंवा गर्भनिरोधक पर्यायांचा वापर न केल्यास ही शंका अधिक दाट होत जाते. आपल्या शरीरात अनेक प्रकारचे बदल तुम्हाला जाणवू लागतात. मासिक पाळी न येणे किंवा लांबणे हे यातील सामान्य आणि प्राथमिक लक्षण असते. परंतु, गर्भधारणा झाल्याची इतरही प्राथमिक लक्षणे आहेत. जसे की, सकाळच्यावेळी आजारपण जाणवणे, थकवा येणे, हलका रक्तस्राव होणे, स्तनात बदल होणे यासारखे बदल शरीरात होतात.
गर्भधारणा झाल्याचे पहिले किंवा प्राथमिक लक्षण प्रत्येक स्रीमध्ये वेगवेगळेही असू शकते. मासिक पाळी चुकल्यानंतरच्या पहिल्याच दिवशी एखाद्या स्रीमध्ये गर्भवती असल्याचे लक्षण जाणवते. तर काहीवेळा गर्भधारणा झाल्यानंतरच्या दोन किंवा तीन आठवड्यानंतर लक्षणे जाणवू लागतात. तर अनेकींना या काळात ही लक्षणेदेखील जाणवत नाहीत. या लक्षणांची संपूर्ण माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

गर्भधारणेची प्रारंभिक लक्षणे

मासिक पाळी चुकणे किंवा लांबणे
मासिक पाळी न येणे म्हणजे आपण गर्भवती आहोत का? हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. खरंतर एखाद्या महिन्यात मासिक पाळी न येणे हे गर्भवती असण्याचे सर्वसामान्य लक्षण आहे. गर्भधारणा झाल्यानंतर आपले शरीर | ह्युमन कोरिओनिक गोनाडोट्रॉपिन | (एचसीजी) हे ग्रंथीसत्व (हार्मोन) तयार करून ते शरीरात सोडण्यास सुरुवात करते. हे ग्रंथीसत्व (हार्मोन) गर्भावस्थेची काळजी घेण्याचे काम करते. तसेच हे ग्रंथीसत्व (हार्मोन) तुमच्या अंडाशयाला दर महिन्याला नवीन अंडी निर्माण न करण्याचा संदेश देते आणि यामुळे मासिक पाळी येणे थांबते.
पण तुम्हाला हे माहीत असायला हवे की, एखादवेळी मासिक पाळी न येणे किंवा नियमित वेळेपेक्षा लांबणे म्हणजे आपण गर्भवती आहोतच असे नाही. मासिक पाळी न येणे किंवा लांबण्यामागील इतरही काही कारणे असू शकतात. लैंगिक संबंध नसतानाही तुम्ही गोळ्या घेत असाल किंवा गोळ्या घेणे थांबवले असल्यास मासिक पाळीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तसेच तणाव, थकवा, जलद वजन वाढणे किंवा कमी होणे तसेच ग्रंथीसत्व (हार्मोन)मधील बदल यामुळे मासिक पाळी चुकणे किंवा लांबणे अशी घटना घडू शकते.
जर तुमची मासिक पाळी नियमित नसेल किंवा मासिक पाळी चक्रानुसार येत नसेल तर पाळी लांबण्याची लक्षणे पुढीलप्रमाणे असू शकतात. जर तुमची मासिक पाळी अनियमित असेल तर स्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्या नक्कीच तुम्हाला योग्य सल्ला देऊन तुमची अडचण सोडविण्याचा प्रयत्न करतील.


सकाळच्यावेळी मळमळ
गर्भधारणा झाल्याच्या साधारण दोन आठवड्यानंतर सकाळच्यावेळी मळमळ किंवा आजारी असल्यासारखे जाणवू शकते. सकाळच्यावेळी मळमळ होणे हे गर्भधारणेच्या प्रारंभिक लक्षणांपैकी एक लक्षण आहे. मासिक पाळी चुकण्याव्यतिरिक्त हे लक्षणही तुम्हाला जाणवू शकते. शरीरात | इस्ट्रोजेन | ग्रंथीसत्वाचे प्रमाण वाढल्यानंतर शरीराला थकवा जाणवतो. यात मळमळ होण्याचे प्रमाणही वाढते. बहुतांश स्त्रियांना गर्भावस्थेच्या १४ व्या आठवड्यापर्यंत हा त्रास होतो आणि नंतर तो हळूहळू कमी होतो. मात्र, काहींना संपूर्ण गर्भावस्थेत या त्रासातून जावे लागते.


हलका रक्तस्राव
गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही महिलेसाठी हलका रक्तस्राव होणे म्हणजे नाराजीचे कारण ठरू शकते. हा रक्तस्राव म्हणजे मासिक पाळी आल्याचा समज होऊन याकडे दुर्लक्ष होऊ शकते. परंतु. कधीकधी गर्भधारणा झाल्यानंतरही रक्तस्राव होऊ शकतो. जर, हा रक्तस्राव किंवा रक्ताचे ठिपके हलक्या रंगाचे असतील तर त्याचे कारण मासिक पाळी व्यतिरिक्त वेगळे असू शकते. जेव्हा फलित अंडे गर्भाशयाच्या अस्तराला जोडले जाते तेव्हा ही प्रक्रिया घडते. त्यामुळे हलका रक्तस्राव होत असल्यास या लक्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण गर्भवती आहोत हे या लक्षणातून देखील समजू शकते.


स्तनात बदल
गर्भावस्थेत शरीरात विविध प्रकारच्या ग्रंथीसत्व (हार्मोन)ची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. परिणामी स्तनामध्ये वेदना जाणवू शकते. गर्भधारणा झाल्याच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी हे पहिले शारीरिक लक्षण असते. यामध्ये स्तनात जडपणा किंवा कोमलता जाणवतो. हे लक्षण साधारणतः गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीपर्यंत कायम असते आणि त्यानंतर याचे प्रमाण कमी होऊ लागते. याचबरोबर स्तनाग्राभोवतीची त्वचा अधिक गडद होऊ लागते. ग्रंथीसत्व (हार्मोन) मधील बदलांमुळे ही प्रक्रिया घडते.


थकवा
तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल किंवा थोड्याफार कामानंतर थकल्यासारखे जाणवत असेल तर हे तुम्ही गर्भवती असल्याचे लक्षण असू शकते. गर्भाशयात गर्भ वाढत असताना आपले शरीर विविध बदल अनुभवत असते. गर्भाच्या वाढीसाठी आपली ऊर्जा यात कामी येत असते आणि परिणामी शरीर ऐरवीपेक्षा लवकर थकते. हे गर्भधारणेच्या विशिष्ट लक्षणांपैकी एक लक्षण आहे. | प्रोजेस्टरॉन | ग्रंथीसत्व (हार्मोन)ची पातळी वेगाने वाढल्यानंतर झोप लागणे किंवा तंद्री लागल्यासारखे जाणवते. जर या थकव्याचा सामना करणे त्रासदायक होत असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. तपासणीद्वारे या थकव्यामागील कारण गर्भधारणा आहे की इतर दुसरे काही हे समजण्यास मदत होईल.


विविध पदार्थ खाण्याची इच्छा
गर्भधारणेनंतर एखादा चमचमीत किंवा विशिष्ट पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होऊ शकते. गर्भाधारणा झाल्यानंतर स्त्रीच्या आवडत्या पदार्थांमध्ये काही वेगळे पदार्थदेखील सामावले जातात. एखादा नवीन पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा या काळात होते. बरेचदा हे पदार्थ नेहमीच्या पदार्थांपेक्षा वेगळे किंवा नवीनही असू शकतात. बहुतांश महिला त्यांच्या नावडीचा पदार्थ चाखण्यातही इच्छुक असतात. तर कधीकधी या बदलांमुळे एखादा पदार्थ न आवडल्याने मळमळदेखील होऊ शकते.


स्वभावात लहरीपणा
गर्भधारणेच्या प्रारंभिक लक्षणांमध्ये स्वभावात लहरीपणा येणे हेदेखील सामान्य लक्षण आहे. विनाकारण रडू कोसळणे किंवा भावनाविवश होणे याचा अनुभव या काळात बहुतांश स्त्रियांना येतो. ग्रंथीसत्व (हार्मोन)मधील बदलांचा परिणाम मनावर झालेला पाहायला मिळतो. परंतु, यात काळजीचे काहीच कारण नाही. ही अतिशय सामान्य गोष्ट असून ताण किंवा इतर गोष्टीही याला कारणीभूत असतात. त्यामुळे गर्भावस्थेत | मूड स्विंग्ज | होत असतील तर त्याकडे सामान्य गोष्ट म्हणून पाहा.


लघवीच्या प्रमाणात वाढ
एरवीपेक्षा सतत लघवीला जावे लागत असल्यास आपण गर्भवती आहोत असे समजण्यास हरकत नाही. सतत लघवी होणे हेदेखील गर्भाधारणेच्या लक्षणांपैकी एक आहे. गर्भधारणेनंतर काही दिवसांत हे लक्षण जाणवायला सुरुवात होते. गर्भाशयाची होणारी वाढ आणि ग्रंथीसत्व (हार्मोन)मधील बदलांमुळे मूत्राशय अधिक गतीने भरते. ज्यामुळे वारंवार लघवी होते. त्यामुळे शरीराला पुरेसे पाणी मिळेल याची काळजी घ्या.


योनीतून स्राव
काही स्रियांमध्ये गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या आठवड्यात योनीतून सफेद रंगाचा घट्ट स्राव होतो. यामागचे कारण म्हणजे गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात योनीमार्गाचे कवच दाट होते आणि योनीमार्गातील स्राव वाढून ते गर्भशिशूचे संसर्गापासून संरक्षण करते. योनीमार्गात खाज सुटणारा किंवा जळजळ होणारा म्हणजेच कुठल्याही संसर्गाशी संबंधित नसलेला स्राव होत असेल तर हे गर्भधारणेचा झाल्याचे लक्षण आहे. जर योनीमार्गातील स्रावानंतर खाज सुटणे किंवा जळजळ होत असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, हे संसर्गाचे लक्षण असू शकते ज्यात उपचारांची गरज आहे.


बद्धकोष्ठता (पोट साफ न होणे)
ग्रंथीसत्व (हार्मोन)मधील बदलांमुळे आणखी एक त्रास वाढतो तो म्हणजे बद्धकोष्ठता. | प्रोजेस्टेरोन | ग्रंथीसत्व (हार्मोन)ची पातळी वाढल्याने पचनक्रिया थंडावते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास स्रियांना जाणवू लागतो.


खरंतर गर्भधारणा झाल्याची बरीच लक्षणे आहेत. जसे की, डोकेदुखी, दम लागणे, चक्कर येणे, बेशुद्ध होणे, एखाद्या विशिष्ट वासाचा त्रास होणे. यापैकी बहुतांश लक्षणे ही गर्भावस्थेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीपर्यंत कायम राहतात. स्वभावात लहरीपणा, सतत लघवी होणे, थकवा, चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा, एखादा पदार्थ किंवा गोष्ट नावडती होणे यासारखी लक्षणे बहुतांश स्रियांमध्ये शेवटपर्यंत दिसतात.
प्रत्येक गरोदरपणात एकाच स्त्रीला वेगवेगळ्या लक्षणांसह वेगळा अनुभव येऊ शकतो. गर्भधारणेची कोणतीही प्रारंभिक चिन्हे तुम्ही अनुभवत नसाल तरी तुम्ही गरोदर आसू शकता. आपण गर्भवती आहोत हे काही स्रियांना सुरुवातीच्या काळात लक्षात येत नाही, हे जाणून घेण्यासाठी त्यांना बराचसा काळ लागू शकतो. जर आपणास वाटत असेल की आपण गर्भवती आहोत आणि यापैकी काही लक्षणे जाणवत नसतील, तर अशावेळी आपल्या स्रीरोग तज्ज्ञांची भेट घ्या. त्या तुम्हाला याविषयी योग्य माहिती आणि उपचार देतील. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाने तुम्हाला यावर उपचार करणेही सोपे होईल.



solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info