9 महिन्याच्या बाळाला काय खायला द्यावे?

Language: Marathi | Published: 10 Oct 2022 | Views: 3
9 महिन्याच्या बाळाला काय खायला द्यावे?
पूरक आहार सुरू करण्यासाठी तृणधान्य-कडधान्य सर्वात योग्य असते. यातही सुरुवात एक तृणधान्य, दुस-या-तिस-या आठवड्यांत दोन ते तीन तृणधान्ये व चौथ्या आठवड्यापर्यंत तृणधान्य मिक्स हा योग्य क्रम आहे. सुरुवात भाताच्या खिरीने करावी. मग रव्याचा शिरा वापरावा. यात गूळ किंवा साखर आणि तेल किंवा तूप वापरावे. सहसा बाळाचे वजन असेल तितके थेंब तेल किंवा तूप वापरावे. सहसा तेल मोहरी, शेंगदाणा, तीळ किंवा सनफ्लॉवर असे मिश्रण वापरावे. तूप शक्यतो गाईचे वापरावे. पुढे खीर बनवण्यासाठी रागी, सुजीचा वापर करावा. पूरक आहार सुरू केल्यावर शेवटच्या आठवड्यापर्यंत चांगल्या शिजवलेल्या डाळींचा वापर करावा. सुरुवात रोज 1 ते 2 चमच्यांनी करावी. मग हळूहळू अर्धा ते एक कप दरवेळी द्यावा. शक्यतो सर्व कुटुंब जेवणास बसते तेव्हाच बाळालाही भरवावे. दिवसभरातून 5 वेळा खाऊ घालावे; पण आग्रह करून खूप भरवू नये. मधल्या वेळेत स्तनपान द्यावे. तांदळाचे 3 हिस्से आणि डाळीचा एक हिस्सा थोडासा धुऊन सुती कापडावर पसरून वाळवावा. वाळलेले धान्य बारीक रव्यासारखे दळून घ्यावे. ही भरड बरणीत भरून ठेवल्यास 7 ते 10 दिवस चांगली राहते. गरज असेल तरच आवश्यक तेवढी भरड पाणी घालून शिजवावी. त्यात मीठसाखर घालून खीर बनवावी व बाळाला द्यावी.
7 ते 9 महिन्यांदरम्यान
या काळात आपल्याच ताटातील चांगले पदार्थ हाताने कुस्करून बाळाला द्यावेत. त्यासाठी मिक्सरचा वापर करू नये. थोडे जास्त शिजवलेले डाळ-भात, कुस्करलेले बटाटे-टोमॅटो, रताळी, तसेच फळेसुद्धा बारीक करून द्यावीत.
9 ते 12 महिन्यांपर्यंत
9 महिन्यांनंतर बाळ चावू शकेल असे मऊ अन्न द्यावे; पण त्यात जास्त तिखट किंवा मसाले टाकून करू नये. उदा. दुधात भिजवलेल्या चपातीचे तुकडे, तसेच आपल्या ताटातील सर्व पदार्थ मऊ करून द्यावेत. अशा वेळी बाळ हातात जेवणाचे तुकडे घेऊन स्वत: खाण्याचा प्रयत्न करते. त्याला तसे करू द्यावे; पण बटाटा किंवा फळांचा मोठा तुकडा हातात जाऊ देऊ नये याची दक्षता घ्यावी. बाळ एक वर्षाचे झाल्यावर त्याने आपल्या ताटात जेवावे. पहिल्या वाढदिवसानंतर वेगळे अन्न नसावे. बाळाला वरच्या दुधाची जास्त गरज भासत नाही. 2 वर्षांनंतर मात्र वरचे दूध देण्यास हरकत नाही. ज्या मुलांना दूध पिणे आवडत नाही त्यांना आग्रह करू नये. सहा महिन्यांनंतर दोन वर्षांपर्यंत स्तनपान सुरू ठेवावे; पण जास्त भर पूरक अन्नावर असावा.

बाळाच्या आहारासाठी भारतीय आहार संस्थेने संशोधन करून ठरवलेल्या काही रेसिपीज पुढीलप्रमाणे आहेत -
खिचडी : तांदूळ 3 मोठे चमचे, भाजलेली मुगाची डाळ, 2 मोठे चमचे पालेभाजी, थोडे मीठ टाकून एकत्र शिजवावे.
लापशी : नाचणीचे पीठ 4 मोठे चमचे, हरभ-याचे पीठ 4 छोटे चमचे, साखर, भाजलेली डाळ, साखर 4 मोठे चमचे एकत्रित मिसळून एकत्र शिजवावी.
बाजरीचा चुरमा : भाजलेली बाजरी 4 चमचे, भाजलेली मुगाची डाळ, 1 मोठा चमचा, भाजलेले शेंगदाणे 2 छोटे चमचे, भाजलेले तीळ 2 छोटे चमचे. प्रत्येक पदार्थ वेगळा करून घ्यावा. सर्व मिसळून डब्यात भरून ठेवावा. दर वेळी 2 चमचे मिश्रण दुधात किंवा पाण्यात मिसळून द्यावे.
गेहुना : भाजलेले गहू 3 मोठे चमचे, भाजलेले मूग 2 मोठे चमचे, भाजलेले शेंगदाणे 2 छोटे चमचे, गूळ 2 मोठे चमचे, या सर्व वस्तू वेगळ्या दळून त्यात गूळ मिसळून गरज असेल तसे वापरावे.
हैदराबाद मिक्स : गहू 3 मोठे चमचे, शेंगदाणे 1 मोठा चमचा, हरभरा 1 मोठा चमचा, गूळ 1 मोठा चमचा. सर्व भाजून दळून गूळ मिसळून ठेवा व हवे तसे वापरा.
Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp