गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाची वाढ कशी होते आणि कालावधी कसा असतो?

Language: Marathi | Published: 10 Nov 2022 | Views: 6
गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाची वाढ कशी होते आणि कालावधी कसा असतो?
बहुतांशी दर महिन्यामध्ये येणारी मासिक पाळी चुकल्यामुळे गर्भावस्था असल्याची शंका येते. वैद्यकीय अधिकारी अशा वेळी प्रत्यक्ष तपासणी किंवा मूत्रतपासणी करून गर्भावस्थेची खात्री करून घेतात. सध्या औषध विक्री केंद्रामध्ये गर्भावस्था असल्याची खात्री करून घेण्यासाठी तयार उपकरणे मिळतात.

8 व्या आठवड्यामध्ये 1 ग्रॅम, 9 व्या आठवड्यामध्ये 2 ग्रॅम, 10व्या आठवड्यामध्ये 4 ग्रॅम, 11 व्या आठवड्यामध्ये 4 ग्रॅम, 12 व्या आठवड्यामध्ये 14 ग्रॅम, 13 व्या आठवड्यामध्ये 23 ग्रॅम, 14 व्या आठवड्यामध्ये 43 ग्रॅम, 15 व्या आठवड्यामध्ये 70 ग्रॅम, 16 व्या आठवड्यामध्ये 100 ग्रॅम, 17 व्या आठवड्यामध्ये 140 ग्रॅम, 18 व्या आठवड्यामध्ये 190 ग्रॅम, 19 व्या आठवड्यामध्ये 240 ग्रॅम, 20 व्या आठवड्यामध्ये 300 ग्रॅम, 21 व्या आठवड्यामध्ये 360 ग्रॅम, 22 व्या आठवड्यामध्ये 430 ग्रॅम, 23 व्या आठवड्यामध्ये 501 ग्रॅम, 24 व्या आठवड्यामध्ये 600 ग्रॅम, 25 व्या आठवड्यामध्ये 660 ग्रॅम, 26 व्या आठवड्यामध्ये 760 ग्रॅम, 27 व्या आठवड्यामध्ये 875 ग्रॅम, 28 व्या आठवड्यामध्ये 1005 ग्रॅम, 29 व्या आठवड्यामध्ये 1153 ग्रॅम, 30 व्या आठवड्यामध्ये 1319 ग्रॅम, 31 व्या आठवड्यामध्ये 1502 ग्रॅम, 32 व्या आठवड्यामध्ये 1702 ग्रॅम, 33 व्या आठवड्यामध्ये 1918 ग्रॅम, 34 व्या आठवड्यामध्ये 2146 ग्रॅम, 35 व्या आठवड्यामध्ये 2383 ग्रॅम, 36 व्या आठवड्यामध्ये 2622 ग्रॅम, 37 व्या आठवड्यामध्ये 2859 ग्रॅम, 38 व्या आठवड्यामध्ये 3083, 39 व्या आठवड्यामध्ये 3288 आणि 40 व्या आठवड्यामध्ये 3462 ग्रॅम इतके अर्भकाचे वजन असणे गरजेचे आहे.

मानवामध्ये हा काळ साधारण ४० आठवड्यांचा असतो. (फलन ते बालकाचा जन्म) या काळाला गर्भारकाळ म्हणतात. गर्भारकाळाचे सामान्यतः तीन काळ मानले जातात.पूर्ण गर्भाची वाढ होण्यास सु. चाळीस आठवड्यांचा कालावधि आवश्यक आहे. हा चाळीस आठवड्यांचा काळ शेवटच्या मासिकपाळीच्या पहिल्या दिवसापासून मोजण्यात येतो. कारण मासिक पाळी आली नाही म्हणजे त्या महिन्याच्या गर्भचक्रामधील बाराव्या ते चवदाव्या दिवशी अंडमोचन आणि निषेचन झालेले असते. सामान्यपणे गर्भावस्थेचे तीन तीन महिन्यांचे तीन टप्पे मानण्यात येतात.

पहिली तिमाही- पहिल्या बारा आठवड्यात भ्रूणावस्था आणि गर्भाची प्राथमिक वाढ होते.

दुसरी तिमाही- गर्भावस्थेचा १३ ते २७ आठवड्यांचा काळ

तिसरी तिमाही- गर्भावस्थेचा २८ ते ४० आठवड्यांचा काळ
पहिली तिमाही

पहिली तिमाही टळलेल्या मासिक पाळीपासून पहिले तीन महिने (१२ आठवडे) हा काळ मानला जातो. स्त्रीमधील अंतरस्रावांमुळे स्तनाग्रे व त्याच्या बाजूच्या भागात रंगबदल होऊन तो ग़डद (Dark) होतो. बाळाच्या वाढीतला सुरुवातीचा हा काळ सर्वात महत्त्वाचा मानला जातो. यात वाढीचे खालील टप्पे असतात.
भ्रूण परिपक्वताचे बदल

फलन- पाळीच्या सामान्यतः १४व्या दिवशी स्त्रीबीज तयार होतो. त्यादरम्यान होणाऱ्या समागमात मिळणाऱ्या शुक्रजंतू योनीमार्गातून गर्भाशयात पोहचतात. ते गर्भनलिकेत एकत्र येतात. शुक्रजंतू स्त्रीबीजात प्रवेश करतात व स्त्रीबीजाचे फलन होते.

निषेचनानंतर पहिले आठ आठवडे व शेवटच्या मासिक पाळीनंतर दहा आठवडेपर्यंत वाढत जाणाऱ्या गर्भपेशी समूहास भ्रूण म्हणण्याची पद्धत आहे. त्यानंतर बाळाचा जन्म होईपर्यंत त्यास अर्भक म्हणतात. पहिल्या तिमाहीमध्ये भ्रूण हे परिसरातील व पर्यावरणातील बदलास अधिक संवेदनक्षम असते. या काळात भ्रूणाचे बहुतेक सर्व अवयव तयार होण्याची प्रक्रिया चालू असते. भ्रूणवृद्धि होत असता त्याभोवती उल्ब नावाचे एक पातळ आवरण तयार होते. या आवरणामुळे भ्रूणाचे संरक्षण होते. उल्बावरणामध्ये उल्बद्रव असतो. या द्रवामुळे भ्रूणाचे/गर्भाचे तापमान बदलापासून आणि धक्क्यापासून प्रसूतिपर्यंत रक्षण होते. गर्भ गर्भशय्येमध्ये रुजल्यानंतर गर्भशय्येतील रक्तवाहिन्यांची तोंडे उघडतात. त्यातून वाहणारे रक्त पोषजनक पेशीतील पोकळ्यामध्ये पसरते. पोषजन्य पेशींचे भरीव स्तंभ आणि रक्तपोकळ्या यांची गुंतागुंतीची जालिकाकार रचना तयार होते. प्रथम रसांकुर, द्वितितक रसांकुर आणि तृतीयक रसांकुर अशा रचनेमुळे मातेचे रक्त आणि त्यामधील पोषक दृव्ये व भ्रूण पेशीमधून बाहेर आलेली अपशिष्टे यांची अदलाबदल या रचनेमध्ये होते. निषेचनानंतर सुमारे सतराव्या दिवशी अशा प्राथमिक वारेची निर्मिती होते. गर्भाच्या वाढीबरोबर वार गर्भाशयाच्या घुमटाकार बाजूस आतून चिकटते. प्रसूति होईपर्यंत गर्भाचे पोषण वारेतून आणि गर्भाशयास चिकटलेल्या अपरेमधून होते. अपरेमधून एचसीजी (ह्यूमन कोरिऑनिक गोनॅडोट्रोपिन) ईस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके मोठ्या प्रमाणात स्त्रवतात. प्रोजेस्टेरॉन हे गर्भरक्षक संप्रेरक आहे. प्रोजेस्टेरॉनमुळे गर्भाशयाचे आकुंचन होत नाही. आणि गर्भ प्रसूतीपर्यंत वृद्धिक्षम राहतो.

गर्भावस्थेच्या चवथ्या आठवड्यात गर्भाची सर्व महत्त्वाची इंद्रिये विकसित झालेली असतात. मज्जारज्जू, मेंदूपोकळ्या तयार होतात. हृदयपेशींचे आकुंचन चवथ्या आठवड्यात चालू होते. अवयवबुंध दिसायला लागतात. आठव्या आठवड्यापर्यंत गर्भाच्या अभिसरणसंस्था, चेतासंस्था, पचनसंस्था, आणि वृक्क व उत्सर्जन संस्था विकसित झालेल्या असतात. सर्व महत्त्वाच्या अवयव विकसित होतात.

५ आठवडे- पहिल्या पाच आठवड्यात भ्रूण तयार होऊन त्यात बदल होतात. भ्रूण एकपेशीयकडून बहुपेशीय प्रकाराकडे रूपांतरित होत असतो.
७ आठवडे- गर्भामध्ये बदल होऊन हृदय सुरू होते. अंडमध्य तयार होऊन त्यापासून इतर अवयव तयार होण्यास प्रारंभ होत असतो.
१२ आठवडे- हाडांची निर्मिती सुरू होते.

गर्भचाचण्या: गर्भवती महिलेच्या मूत्रामध्ये एचसीजी आढळते. बहुतेक तयार गर्भचाचणी संचामध्ये एचसीजी चाचणीवरून गर्भ राहिल्याचे निदान करण्यात येते. आजपर्यंतच्या अभ्यासावरून ५० ते ७०% गर्भाच्या चेतासंस्थेमधील दोष गर्भवती महिलेस फॉलिक ॲसिड (बी9 जीवनसत्त्व) दिल्यास दूर होतात असे आढळून आले आहे. गर्भवती होऊ इच्छिणाऱ्या महिलेस दररोज ४०० मिग्रॅ फॉलिक ॲसिडची मात्रा पुरेशी आहे. क्षकिरण चिकित्सा, काहीं औषधे, आणि प्रदूषके यांचा पहिल्या तिमाहीमध्ये गर्भावर अनिष्ट परिणाम होतो. त्यामुळे क्षकिरण चिकित्सा टाळतात. वैद्यकीय अधिकाऱ्यांना गर्भवती स्त्री घेत असलेल्या औषधांची पूर्ण माहिती दिली असेल तर व त्यांनी. गर्भजलचिकित्सा आणि अल्ट्रासाउंड करायचा सल्ला दिल्यास ह्या चाचण्या खात्रीलायक केंद्रामधून करून घेणे हितावह असते. बाराव्या आठवड्यापर्यंतच्या गर्भाचे लिंग अल्ट्रासाउंड चाचणीमधून कळते. पण अशी गर्भलिंग चिकित्सा करण्यास कायद्याने बंदी आहे.
दुसरी तिमाही
गर्भावस्थेतील दुसऱ्या काळात गर्भाशयाची स्थिती

दुसरा काळ हा टळलेल्या पाळी पासून पहिले तीन महिने (१२ आठवडे) ते ६ महिने (२८ आठवडे) हा काळ मानला जातो. या काळात वजन वाढण्यास सुरुवात होते. गर्भधारणा असलेले १२ आठवड्याचे गर्भाशय ओटीच्यावर हाताला जाणवते. बाळाची वाढ सुरू राहते. २० आठवडे पूर्ण होताना मातेस गर्भाची हालचाल जाणवू लागते. गर्भातील बाळाची इन्सुलिन तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते. गर्भ मूत्रविसर्जन करते. हे गर्भजलाचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. याकाळात जननेंद्रिय तयार होते आणि हे भ्रूण स्त्री-पुरुष म्हणून ओळखले जाऊ शकते.

गर्भावस्थेची दुसरी तिमाही १३ ते २७ आठवड्यांची असते. या कालावधीमध्ये गर्भाची प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया आणि स्नायूंचे चलनवलन चालू होते. गर्भाच्या मेंदूची वाढ हा या टप्प्यामधील महत्त्वाचा घटक आहे.

१४-१६ आठवडे पूर्ण होताना स्तनांमध्ये पिवळसर चिकट द्रव तयार होणे सुरू होते. गर्भाशयाला ब्रॅस्टन-हिक्स आकुंचन (Braxton Hicks contractions) सुरू होतात. या गर्भारपणात गर्भाशयाच्या स्नायूंची हालचाल करून त्यातील ताण व्यवस्थित करण्याबरोबर गर्भाला उत्तेजित करत असतात. याद्वारे भ्रूणातील रक्तसंक्रमण व्यवस्थित केले जाते.
तिसरी तिमाही

तिसरा काळ हा टळलेल्या पाळीपासून पहिले सहा महिने (२८ आठवडे) ते ९ महिने (३८ आठवडे) हा काळ मानला जातो. २८व्या आठवड्यापासून प्रसूतिपर्यंत गर्भावस्थेची तिसरी तिमाही मानण्यात येते. मेंदू, वृक्क आणि फुफ्फुसे असे सर्व महत्त्वाचे अवयव आणि इंद्रिये पूर्णपणे विकसित होण्याचा हा काळ असतो.. ३६व्या आठवड्यात गर्भाचे डोके गर्भाशयमुखाकडे येते. ३७व्या आठवड्यात गर्भाची वाढ पूर्ण झाल्याचे मानण्यात येते. गर्भाचे वजन या सुमारास ३०००-३६०० ग्रॅम झालेले असते. मातेचे अपुरे पोषण आणि गर्भाशय लहान असणे एकाऐवजी दोन गर्भ गर्भाशयात असण्याने (पहा जुळे) कमी वजनाचा गर्भ विकसित होतो.

गर्भ २९ आठवड्याचा असताना बाळाची वाढ झपाट्याने होते, तसेच त्याच्या अवयवांना बळकटी येते. बाळाला अंगभर लव (बारीक केस) येते त्यास लॅन्युगो(lanugo) म्हणतात. बाळाच्या त्वचेचे रक्षण करण्याकरिता पांढरा चिकट द्रव संपूर्ण अंगभर पसरलेला असतो. त्यास व्हर्निक्स (vernix) म्हणतात. या काळात बाळाच्या मेंदूची तसेच फुप्फुसांची वाढ झपाट्याने होते. माता जे सेवन करेल ते नाळेद्वारे बाळापर्यंत पोहोचत असते. ३४ आठवडे पूर्ण होताना फुप्फुसांची वाढ पूर्ण झालेली असते. जशी जशी प्रसूती जवळ येते बाळ मोठे झाल्यामुळे गर्भाशयात फिरण्यासाठी जागा कमी असते त्यामुळे बाळाची हालचाल मंदावते. ३८ आठवड्याच्या वाढीचे बाळ पूर्ण वाढीचे मानले जाते.

शेवटच्या मासिक पाळीनंतर साधारण ४० आठवड्यांनी बाळाचा जन्म होतो.
Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp