‘गोड बातमी’चे दिवस
लग्नानंतरच्या नव्या नवलाईचे दिवस लवकर संपतात व नवविवाहित तरुण-तरुणी इवल्याशा गोड बाळाची स्वप्ने बघायला लागतात. देवदयेने कोणताही अडथळा न येता साधारण ७५-८० टक्के जोडप्यांना लवकरच गर्भधारणेच्या बातमीचा आनंद घेता येतो. गर्भारपणाच्या या दिवसांत स्त्रीच्या शरीरात कोणते बदल होतात? या बदलांमुळे कोणती लक्षणे दिसतात? तिला कोणते त्रास होतात? कोणती काळजी घेतली पाहिजे? आहार कसा असावा, इत्यादी अनेक प्रश्नांकडे आपण पुढील ३-४ लेखांत नजर टाकणार आहोत.
गर्भारपणाचा नक्की काळ किती व प्रसूतीची अपेक्षित तारीख कोणती, याचे फक्त एकच उत्तर आहे. २८० दिवस किंवा ४० आठवडे. ज्या स्त्रीला आपल्या शेवटच्या मासिक पाळीचा पहिला दिवस माहीत असेल, तिला प्रसूतीची संभ्याव्य तारीख सहजपणे समजू शकते; परंतु ज्या स्त्रियांची मासिक पाळी अनियमित आहे, त्यांना ही तारीख सहा ते सात आठवड्यांच्या आसपास केलेल्या सोनोग्राफीच्या मदतीने ठरवावी लागते. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही संभाव्य तारीख आहे. प्रत्यक्षात प्रसूती या तारखेच्या आधी २-३ आठवडे होऊ शकते. तारीख उलटल्यानंतर मात्र साधारण १०-१४ दिवसांपर्यंत वैद्यकीय देखरेखीखालीच थांबणे उचित ठरते. हा गरोदरपणाचा काळ तीन विभागांत विभागतात.
पहिली तिमाही वा पहिले १२ आठवडे, दुसरी तिमाही वा १३ ते २८ आठवडे, तिसरी तिमाही वा २९ ते ४० आठवडे. हे गरोदरपणाचे टप्पे जरी एकसंध असले तरी या तीनही टप्प्यांमध्ये शरीरात व बाळामध्ये वेगवेगळे बदल घडत असतात व म्हणूनच या वेळची लक्षणे व काळजीही थोडीफार वेगळी असते.
गर्भारपणाचे निदान
पूर्वीच्या काळी असा समज होता की, मासिक पाळी चुकल्यानंतर ३-४ महिन्यांनी डॉक्टरांकडे जाणे चांगले व त्यामुळे अनेकजणी आजही गर्भारपणाचे निदान करण्यासाठी २-३ महिन्यांनी येतात. सध्या मासिक पाळी चुकल्यानंतर १ ते २ दिवसांत प्रेग्नन्सी टेस्ट करणे शक्य आहे. औषधांच्या दुकानात ही टेस्ट करण्याचे साहित्य सहज मिळू शकते. रक्तातील संप्रेरकांचे प्रमाण (Serum B HCG) मोजून मासिक पाळी चुकल्याच्या ११ दिवस आधीदेखील हे निदान करता येते. रक्तातील प्रमाण मोजल्यामुळे वेगवेगळ्या रोगांचे निदानही करता येते व वेळेवर उचारही करता येतात. म्हणूनच जितक्या लवकर वैद्यकीय सल्ला घ्याल तितके चांगले. ज्यामुळे गर्भपात टाळता येऊ शकतो.गर्भारपणाच्या ४० आठवड्यांत शरीरात नेहमीच्या शारीरिक प्रक्रिया खूपच जास्त वेगाने होतात. शरीरातील संप्रेरकांच्या बदलत्या पातळ्या परिणाम करतात. चयापचय क्रियेत खूपच जास्त वाढ होते. पाण्याचे व रक्ताचे प्रमाण वाढते, रक्ताभिसरण संस्थेत, श्वसनसंस्थेत, अन्नसंस्थेत, गर्भाशयात, रक्तातील वेगवेगळ्या घटकांच्या प्रमाणामध्ये खूप बदल होतात. इथे एक मुद्दा मला आग्रहाने सांगावासा वाटतो. या कालावधीत गर्भार स्त्रीला अनेक लक्षणे दिसतात व मळमळणे, थकवा वाटणे इ. असंख्य त्रास होतात. ब-याच जणी यामुळे घाबरतात; किंवा चिंतित होतात. त्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे की हे सर्व बदल नैसर्गिक आहेत. शरीराच्या कार्यप्रणालीतील बदलामुळे हे होते. हा कोणताही आजार किंवा रोग नाही. म्हणूनच तो शांतपणे स्वीकारणे आवश्यक आहे. प्रेग्नन्सीपूर्वी आपल्याला जसे वाटत होते त्या स्थितीशी तुलना करून नका. मला काहीही होता कामा नये, याचा अट्टहास सोडणे आवश्यक आहे. त्रास होतो म्हणून जास्त औषधे जर घेतली तर गर्भावर परिणाम होऊ शकतो. म्हणून खूपच जास्त त्रास असेल तर डॉक्टरकडून योग्य प्रमाणात औषधोपचार घ्यावेत. सर्वसाधारणपणे गर्भारपणाच्या सुरुवातीला पुढील काही लक्षणे आढळतात. त्यांची कारणे जर समजून घेतली तर मानसिक चिंता कमी होऊ शकते.
ओटीपोटात दुखणे, जड वाटणे : ‘मासिक पाळी तर सुरू होणार नाही ना? दर महिन्याला जसे दुखते तसेच आज दुखत आहे,’ ही चिंता अनेक जणींना वाटते. परंतु जर गर्भधारणा योग्य असेल तर याची काळजी करण्याचे अजिबात कारण नाही. गर्भाशयाच्या आकारात झालेली वाढ, त्याच्या स्नायूंवर आलेला ताण, गर्भाशय, योनिमार्ग व ओटीपोटातील इतर अवयव यांकडे खूपच जास्त प्रमाणात रक्तपुरवठा होत असतो. यामुळेच अशा प्रकारचे दुखते.
योनिमार्गातून पांढरा स्राव जास्त जाणे : वर सांगितल्याप्रमाणे रक्ताचा पुरवठा वाढतो व संप्रेरकांच्या वाढत्या परिणामाने या मार्गातील ग्रंथी जास्त प्रमाणात स्राव निर्माण करतात. वैद्यकीय सल्ला घेऊन कोणत्याही प्रकारचा जंतुसंसर्ग नाही ना याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. जंतुसंसर्ग न होण्यासाठी योग्य स्वच्छता ठेवणे महत्त्वाचे आहे. या काळात सुती कपडे वापरणे योग्य.
थकल्यासारखे वाटणे : या काळात शरीराच्या सर्व क्रिया खूप जास्त वेगाने होत असतात. तुमचे शरीर जणू दुप्पट वेगाने काम करत असते. म्हणूनच तुम्हाला विशेष दैनंदिन काम न करताही थकवा येतो. या अवस्थेत तुमच्या मेंदूतील झोपेच्या केंद्रावरही बदल झालेला असतो म्हणून खूप जास्त प्रमाणात झोप येते. रात्री ७-८ तास व दुपारी तासभर झोप शरीराला आवश्यक आहे.
मळमळणे, चक्कर येणे : सर्वपरिचित हे लक्षण पहिल्या तीन महिन्यांत कमी-जास्त प्रमाणात आढळते. मेंदूमधील केंद्राच्या वेगवेगळ्या संवेदनशीलतेच्या प्रमाणात कमी-अधिक त्रास होतो. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी कमी-जास्त त्रास होतो. काहींना सकाळी जास्त, तर काहींना संध्याकाळी. बहुतेक फोडणीचा वास किंवा काही ठरावीक पदार्थांमुळे त्रास जास्त होतो. थोडेफार मळमळणे/ कोरड्या उलट्या किंवा दिवसातून २-३ वेळा खाल्लेले अन्न उलटून पडणे हे होऊ शकते. यापेक्षा अधिक त्रास होत असेल तर ताबडतोब वैद्यकीय मदत आवश्यक आहे. जे पदार्थ त्रास न होता खाऊ शकतात ते खा आणि जेव्हा बरे वाटते आहे तेव्हा खा. भरपूर पाणी किंवा सूप, फळांचे रस, दूध, ताक इ. प्रवाही पदार्थ सेवन करा. इडली, सँडविच. इ. फोडणी नसलेले पदार्थ खाल्ले तर त्रास कमी होतो. आले - लिंबू यांचा रस थोड्या थोड्या वेळाने घेणे योग्य.
स्तनांमध्ये बदल : प्रसूतीनंतर स्तनपान देण्यासाठी आवश्यक बदल म्हणजे ग्रंथींमध्ये वाढ, रक्ताभिसरण जास्त होणे, इ. बदल प्रोलॅक्टिन या संप्रेरकामुळे सुरुवातीपासूनच होऊ लागतात. स्तनांचा आकार वाढणे, थोडे दुखणे, घट्ट घट्ट वाटणे, त्वचेचा रंग बदलणे, स्तनाग्रे काळसर रंगाची होणे इ. लक्षणे दिसतात. योग्य मापाचे कपडे वापरणे आवश्यक आहे.
मासिक पाळी चुकल्यानंतर किती दिवसांनी गर्भधारणा चाचणी?