मासिक पाळी झाल्यानंतर किती दिवसांनी?
सर्वप्रथम मासिक पाळी च्या चक्राविषयी जाणून घेवूयात. मासिक पाळीचे चक्र हे सर्वसाधारणपणे २२ ते ३५ दिवसाचे असते. या काळात एक स्त्रीबीज पूर्ण तयार होऊन बीजकोषातून बाहेर येते व बीजवाहिन्यांमध्ये जाते. या प्रक्रियेला अंडोत्सर्जन (Ovulation) म्हणतात. बीजवाहिनीमध्ये हे बीज १२-२४ तास जिवंत असते. त्या काळात पुरुष बीजाशी संपर्क आला तर तिथे त्यांचं मिलन होऊन गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. त्यासाठी पाळी चक्रातला अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता आला की त्यानुसार गर्भधारणेसाठी किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. बऱ्याच जणांचा असा समाज असतो की अंडोत्सर्जन १४ व्या दिवशीच होत. पण बहुतेक वेळा ते लवकर किंवा उशीराही होत असत. प्रत्येकाचा मासिक चक्राचा काळ वेगळा असल्यामुळे अंडोत्सर्जनाचा काळ ही वेगळा असू शकतो हे लक्षात घेणे गरजेचे आहे. म्हणूनच गर्भधारणा नकोच असेल तर योग्य ते गर्भनिरोधक वापरणे कधीही चांगले. मासिक पाळी च्या दरम्यान सेक्स करू नये असा काहीही नियम नाही. हा एक प्रचलित गैरसमज आहे की मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीर संबंध येऊ देऊ नयेत. ह्या गैर समाजाचा संबंध पाळीच्या काळात स्त्री अपवित्र असते, तिला स्पर्श वर्ज असतो, पाळीतील रक्त अपवित्र असतं म्हणून तिला ‘बाजूला’ बसवलं गेलं पाहिजे ई अशास्त्रीय बाबी ज्या आपण अनेक पिढ्या सांभाळत आलो आहोत त्यांच्याशी आहे. ह्या पितृप्रधान परंपरा आणि गैरसमजुतीनाच प्रश्न विचारणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे पाळीच्या दरम्यान सेक्स केल्याने स्त्रीला किंवा पुरुषाला काहीही अपाय होत नाही. ह्या दिवसांत संबंध आले तर गर्भधारणेची भीतीही नसते. पण या सोबतच एक गोष्ट लक्षात ठेवू या की पाळी दरम्यान रक्त स्त्राव होत असतो. काही जणींना या काळात ओटी पोटात दुखणे, पाठ दुखणे किंवा चीड चीड होणे अशा लक्षणांचा सामना करावा लागतो. अशा काळात शरीर संबंधांची इच्छा नसणं, नको वाटणं सहज आहे. तसं असेल तर त्याचा आदर कारण गरजेचं आहे. लक्षात घ्या शरीर संबंधांसाठी त्यात सामील व्यक्तींनी एकमेकांची संमती, इच्छा, एकमेकांप्रती किमान आदर आणि सर्वांचा आनंद या गोष्टीना महत्व देणं फार गरजेचं आहे