मासिक पाळीच्या समस्या व उपाय?pregnancytips.in

Posted on Thu 14th Mar 2019 : 09:56

मासिक पाळीच्या समस्या

पाळीपूर्व तणाव
पहिली पाळी (पदर येणे) लवकर येणे
उशिरा पाळी येणे
पाळी आतल्या आत राहणे
पाळी न येणे
तीन आठवडयांची पाळी (लहान पाळी)
पाळी कमी दिवस व थोडी जाणे
पाळी थांबणे
पाळीच्या वेळी किंवा आधी पोटात दुखणे
पाळी जास्त जाणे
पाळी थांबताना होणारा त्रास
इतर आजार
पाळीच्या वेळचे दुखणे आणि आयुर्वेद
होमिओपथी निवड
पाळी थांबताना होणारा त्रास
इस्ट्रोजेन (E)
प्रोजेस्टेरॉन (P)चे उपयोग
स्त्रीबीज - सूचना : स्वयंतपासणी
गर्भाशयाच्या तोंडावरचा चिकटा तपासणे
इतर खुणा


पाळी येणे म्हणजे नेमके काय होते हे आपण पूर्वी पहिले आहे. पाळी ही जरी सामान्य शारीरिक घटना असली तरी पाळीच्या संबंधात अनेक तक्रारी असतात. त्यासाठी कधीकधी सल्ल्याची व उपचाराची गरज भासते. पाळीच्या संबंधीच्या तक्रारींचे खालीलप्रमाणे प्रकार आहेत.

पहिली पाळी लवकर किंवा उशिरा येणे
पाळी लवकर लवकर येणे (कमी अंतराने)
पाळी जास्त अंतराने येणे-किंवा न येणे
पाळीच्या आधी व मध्ये पोटात दुखणे
रक्तस्राव कमी जाणे व कमी दिवस जाणे
रक्तस्राव जास्त जाणे व जास्त दिवस जाणे
पाळी थांबताना होणारा त्रास.

पाळीपूर्व तणाव

ब-याच मध्यमवयीन स्त्रियांना हा त्रास होतो. यात स्तन हळवे होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, डोकेदुखी, झोप न लागणे, चिडचिड, थकवा, थोडे वजन वाढणे, इ. त्रास होतात. ही सर्व लक्षणे शरीरात संप्रेरकांमुळे होणा-या बदलांमुळे असतात. पाळीच्या आधी 1-2 आठवडे हा त्रास होतो. पाळीची तारीख जवळ येईल तसे मानसिक त्रास वाढतात. शारीरिक त्रासही थोडेफार वाढतात.

उपचार

लक्षणे त्रासदायक असतील तर त्या स्त्रीला आधी आजार समजावून सांगावा. हा त्रास तात्पुरता आणि पाळीशी संबंधित असल्याने जाणार आहे याची माहिती द्यावी. जीवनसत्त्व'ब' च्या गोळया द्याव्यात. मीठ खाण्याचे प्रमाण कमी केल्यास लक्षणे कमी होतात. आयब्रूफेन किंवा दाह-विरोधी औषधांचाही उपयोग होतो.
पहिली पाळी (पदर येणे) लवकर येणे

पाळी येताना मुलीला धीर देणे व शरीरविज्ञान समजावून सांगणे आवश्यक असते.

सर्वसाधारणपणे मुलींना 12 ते 14 वर्षे या काळात पहिली मासिक पाळी (रजोदर्शन) येते. सुरुवातीस वर्ष-सहा महिने मासिक पाळी अनियमित असू शकते. त्यानंतर ती नियमित होते.

काही मुलींना 12 वर्षाच्या आधीच म्हणजे 10-11 व्या वर्षातच पाळी येते. 10 वर्षे पूर्ण व्हायच्या आत पाळी आली असेल तर याला 'लवकर पाळी आली' असे म्हणता येईल. अशा मुलींमध्ये स्त्रीत्वाची सर्व चिन्हे लवकर दिसतात (उदा. स्तनांचा आकार वाढणे/योनिद्वारावर व काखेत केस येणे). पाळी लवकर येणे ही घटना स्त्रीसंप्रेरकांवर अवलंबून असते.
उशिरा पाळी येणे

वयाच्या 14 वर्षानंतर पहिली पाळी आली तर ती 'उशिरा आली' असे म्हणता येईल. कुपोषणामुळे शरीराची अपुरी वाढ, काबाडकष्ट, इत्यादींमुळे पाळी उशिरा येऊ शकते. मात्र पाळी जरी अशी उशिरा आली तरी फार बिघडत नाही. 16 वर्ष पूर्ण होईपर्यंत पाळी आली नाही तर तपासणी होणे जरुरी असते.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही आदिवासी समाजात पाळी येण्याच्या आधीही लग्ने होतात. अशा वेळेस पाळी येण्याऐवजी एकदम गर्भ राहण्याची शक्यता असते. असे झाले तर बाळंतपणानंतर किंवा गर्भपातानंतर काही महिन्यांनी पहिली पाळी येईल.
पाळी आतल्या आत राहणे

काही मुलींच्या बाबतीत योनिमार्गावरचा पडदा अखंड-बिनछिद्रांचा असतो. पाळी आली तरी रक्त आत योनिमार्गातच साठून राहते. रक्तस्राव बाहेर दिसत नाही. प्रत्येक पाळीच्या वेळी पोटात दुखणे, ओटीपोटात फुगवटा येणे ही लक्षणे आढळतात. अशी शंका असल्यास डॉक्टरकडे पाठवा.
पाळी न येणे

काही प्रसंगी पिच्युटरी ग्रंथी, बीजांडाची वाढ व कार्य यांत जन्मतःच दोष किंवा काही आजारांनी (उदा. क्षयरोग) बिघाड होतो. यामुळे स्त्रीसंप्रेरक निर्माण होण्यातच अडथळा येतो व पाळी येतच नाही. स्त्रीजननसंस्थेची वाढच अपुरी किंवा सदोष झाली असेल तरी पाळी येत नाही. अशा वेळी बहुधा स्त्रीत्वाच्या खुणा वेळेवर निर्माण झालेल्या नसतात.

यामागे अनेक प्रकारचे जन्मजात दोष असू शकतात. स्त्री-पुरुष या दोन्हींच्या मधली प्रकृती (तृतीय प्रकृती) असणे, गर्भाशय किंवा योनिमार्ग बंद असणे, बीजांडात दोष असणे,गर्भाशय नसणे, थॉयरॉईड किंवा गळयातील ग्रंथींचा दोष किंवा अपुरेपणा, मेंदूखालील नियंत्रक ग्रंथी सदोष असणे यांपैकी काहीही दोष असू शकेल. यासाठी तज्ज्ञाकडे पाठवा.

यासाठी 16 वर्षे वयानंतरही पाळी न आल्यास स्त्रीरोग तज्ज्ञाकडून तपासणी करून घेणे जरूरीचे आहे.
तीन आठवडयांची पाळी (लहान पाळी)

मासिक पाळीचे चक्र सामान्यपणे 28 दिवसांचे असते. म्हणजे रक्तस्रावाचे तीने ते पाच दिवस सोडल्यास दोन रक्तस्रावांमध्ये सुमारे 25 दिवस जातात. यात दोन-तीन दिवस मागेपुढे बदल होऊ शकतो. उदा. एखाद्या स्त्रीची पाळी 21 दिवसांचीच असेल तर एखादीची30 दिवसांची. तसेच त्याच स्त्रीची एक पाळी 28 दिवसांनी तर दुसरी थोडी मागेपुढे येऊ शकेल. पण नेहमीच 21 दिवसांच्या आत पाळी येत असली तर या प्रकाराला 'लहान पाळी'म्हणता येईल. अशा स्त्रियांना मासिक पाळीत बहुधा जास्त दिवस रक्तस्राव होतो. या त्रासाला कायमचा असा उपाय नाही. यासाठी स्त्रीरोग-तज्ज्ञाकडे पाठवावे. स्त्रीसंप्रेरके देऊन त्या त्या पाळीपुरता उपयोग होतो.
पाळी कमी दिवस व थोडी जाणे

या प्रकारात पाळी महिन्याला व नियमितपणे येते. पण अंगावर फक्त एक-दोन दिवस रक्तस्राव होतो. होतो तोही रक्तस्राव अगदी थोडा होतो. मात्र स्त्रीबीज तयार होतच असते. त्यामुळे अशा स्त्रियांना इतरांसारखीच गर्भधारणा होते. पण याबरोबर पाळी अधिकअधिक अंतराने येत असली तर शरीरात काहीतरी बिघाड होत आहे असा अर्थ काढला पाहिजे. अशा वेळी पाळी थांबण्याचीही शक्यता असते. पाळी वेळच्या वेळी येत असेल तर मात्र घाबरण्याचे काही कारण नाही आणि उपचाराचीही गरज नसते.
पाळी थांबणे

गर्भधारणेच्या किंवा बाळाला अंगावर पाजण्याच्या काळात पाळी येत नाही. 45-50 वर्षे वयानंतर बहुधा पाळी थांबते हेही आपण पाहिले. पाळी पूर्वी येत होती; पण आता येत नसल्यास काही दोष तयार झाले असण्याची शक्यता आहे. उदा. गर्भाशय, योनिमार्गात अडथळा तयार होणे, गर्भपिशवी काढून टाकणे, स्त्रीबीजांडात गाठी तयार होणे व अनेक प्रकारच्या शारीरिक दोषांमुळे ही घटना होऊ शकते.
पाळीच्या वेळी किंवा आधी पोटात दुखणे

अनेक स्त्रियांना पाळीची सुरुवात होण्याआधी 7 ते 10 दिवस अनेक प्रकारचा त्रास होतो. चिडखोरपणा, थकवा, लघवीला वारंवार लागणे, डोकेदुखी, पोटात कळ,बध्दकोष्ठ, छाती-स्तन दाटून येणे, पायावर सूज यापैकी एक वा अनेक प्रकारचे त्रास होतात. यातला बहुतेक त्रास शरीरात या काळात पाणी व क्षार जास्त साठल्यामुळे होतात. म्हणून असे त्रास होत असल्यावर पाणी व मीठ घेण्याचे कमी करून बरे वाटते. मात्र एवढयाने भागत नसल्यास डॉक्टरकडे जावे.
काही स्त्रियांच्या बाबतीत पाळीच्या आधी तीन-चार दिवस ओटीपोट/ कंबर दुखण्याचा त्रास होतो. हा त्रास रक्तस्राव सुरु झाल्यावर थांबतो. या त्रासाचे मुख्य कारण म्हणजे ओटीपोटात काहीतरी आजार असणे. रोगनिदानासाठी तज्ज्ञाची मदत लागेल. पण असा त्रास होणा-या प्रत्येकीलाच आजार नसतो. या दुखण्यावरचा तात्पुरता उपाय म्हणजे ऍस्पिरीनच्या गोळया देणे.
आणखी एक प्रकार म्हणजे पाळी सुरु झाल्याझाल्या ओटीपोटात दुखून येते. हे दुखणे थोडा वेळ टिकून, थांबून थांबून येते. पाळीच्या तीन-चार दिवसांत हा त्रास चालूच राहतो. अशा प्रकारचे दुखणे ब-याच वेळा आढळून येते. हे दुखणे बहुधा पाळी सुरु झाल्यानंतर दोन-तीन वर्षांनी सुरु होते. असे दुखणे एक बाळंतपण झाल्यावर पूर्ण थांबते. या दुखण्याचे कारण कळलेले नाही, पण स्त्रीसंप्रेरकांमुळेच हे घडत असावे. दुखणे तात्पुरते थांबण्यासाठी ऍस्पिरीनच्या गोळयांचा चांगला उपयोग होतो. एवढयावर दुखणे थांबत नसल्यास तज्ज्ञाकडे पाठवावे.

अंगावरून तांबडे जाणे (स्त्रियांच्या अंगावरून रक्तस्राव) (तक्ता (Table) पहा)
पाळी जास्त जाणे

पाळी जास्त जाणे म्हणजे पाळीत जास्ती रक्तस्राव जाणे. काही वेळा गर्भाशयाच्या गाठी,गर्भनलिका व बीजांड यांची सूज, शरीरातील इतर प्रकारचे दोष (उदा. रक्तस्रावाची प्रवृत्ती असणे) इत्यादींमुळे पाळी जास्त जाते. मात्र अनेक स्त्रियांमध्ये याचे कसलेही कारण सापडत नाही. या प्रकारात पाळी वेळच्या वेळी येते, पण बरेच दिवस रक्त जाते. रक्तस्राव जास्त गेल्याने रक्तपांढरी होऊ शकते.

पाळी जास्त जाण्याचे कारण शोधणे हे स्त्रीरोग तज्ज्ञाचेच काम आहे. यासाठी गर्भाशयाचा अंतर्भाग खरवडून काढून (क्युरेटिंग) तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जातो. या तपासणीत काही अंदाज बांधता येतो. मात्र सर्वच रुग्णांच्या बाबतीत निदान होऊ शकत नाही.

या खरवडण्यामुळे आतले आवरण जाऊन तात्पुरता रक्तस्राव थांबतो. (हे आवरण परत निर्माण होते) निदान काही स्त्रियांना तरी यामुळे थोडा उपयोग होतो. काहींच्या बाबतीत स्त्रीसंप्रेरके देऊन रक्तस्रावावर नियंत्रण करता येते. ज्या स्त्रियांना वारंवार औषधे घेऊन विशेष उपयोग होत नाही, त्यांच्या बाबतीत बहुधा गर्भाशय काढून टाकण्याचे ऑपरेशन करावे लागते.

काही स्त्रियांना गर्भाशयाचा काहीच आजार दिसत नसून रक्तस्रावाचा त्रास होतच रहातो. अशा वेळी टी.सी.आर. नावाचा उपचार करतात. यात ऑपरेशनने गर्भाशय काढत नाहीत पण दुर्बिणीतून लेझरच्या साहाय्याने गर्भाशयाचे आतले आवरण जाळून टाकतात. या क्रियेनंतर ब-याच स्त्रियांची पाळी जाते. काही स्त्रियांना सुरुवातीला पाळी जाते पण काही महिन्यांनंतर पुन्हा पाळी सुरु होते. पण ही पाळी त्रास होण्याएवढी नसते. काही स्त्रियांना मात्र परत त्रास सुरु होऊन गर्भपिशवी काढून टाकण्याचे ऑपरेशन करावे लागते.
पाळी थांबताना होणारा त्रास

पाळी थांबताना म्हणजे 45-50 वर्षे वयाच्या काळात पाळी थांबण्याच्या अनुभवातून जाणा-या स्त्रीला अनेक शारीरिक व मानसिक त्रास होतात. हे त्रास 'आजार' म्हणावेत इतके स्पष्ट नसतात. एकतर ते दोन-तीन वर्षे होत राहतात. काही स्त्रियांच्या बाबतीत पाळी अचानक थांबते. हे बदल हळूहळू होत असल्याने लक्षात येत नाहीत. पाळी थांबणे ही घटना स्त्रीसंप्रेरकावरच अवलंबून आहे. संप्रेरकांच्या प्रमाणात बदल होत असल्याने शरीरातही अनेक बदल जाणवतात. थकवा, नैराश्य, चिडचिडेपणा, इत्यादी गोष्टी जाणवतात. सर्वच स्त्रियांना असा त्रास होत नाही. पण ज्यांना त्रास होतो त्यांना घरातल्या इतरांनी -नवरा, मुले, सुना, इत्यादींनी समजावून घेणे, धीर देणे आवश्यक असते.

पाळी थांबताना घाम येणे, छातीत धडधडणे, छातीत दुखणे, हातपाय बधिर होणे,मुंग्या येणे, डोकेदुखी, कानात गुणगुण, लैंगिक इच्छा वाढणे, शरीरावरची चरबी वाढणे,पोटात गॅस होणे, बध्दकोष्ठ, लघवीला त्रास, इत्यादी निरनिराळे अनुभव येतात. हे त्रास हळूहळू थांबतात.

मासिक पाळी थांबताना स्त्री जननसंस्थेचा एकूण संकोच होतो व कार्य थांबते. योनिद्वार व योनिमार्ग निबर होतात व लहान होतात. गर्भाशयाचे तोंड लहान होते. गर्भाशयाचे अस्तर व स्नायू पातळ होतात. स्त्रीबीजांडेही लहान होतात. योनिद्वारावरचे केस कमी होतात. त्वचा सुरकुतते.

या बदलांमुळे लैंगिक इच्छा कमी होते. नंतर नंतर लैंगिक संवेदनांचा त्रास होतो,कारण लिंगप्रवेशासाठी पुरेसे वंगण व मऊपणा नसतो.

मासिक पाळी थांबण्याचा हा एकूण त्रास जास्त असला तर स्त्रीसंप्रेरकांचा उपचार उपयुक्त ठरतो. मात्र असा उपचार जास्तीत जास्त 10 वर्षे ठीक आहे. शेवटी तो कधीतरी थांबवावाच लागतो.

पाळी थांबण्याच्या काळात अंगावरून जास्त रक्तस्राव होत असल्यास दुर्लक्ष करू नये. अशा स्त्रियांना ताबडतोब स्त्रीरोग तज्ज्ञाकडे पाठवून गर्भाशयात काही आजार आहे अथवा नाही याची खात्री केली पाहिजे. तसेच अंगावरून सतत रक्त जाणे, जास्त रक्त जाणे,अनियमित रक्त जाणे, पाळी थांबल्यावर सहा महिन्यांनी किंवा नंतर कधीही परत रक्तस्राव होणे यांपैकी तक्रारी असतील तर दुर्लक्ष न करता तज्ज्ञाकडे पाठवावे.
इतर आजार

मासिक पाळी थांबताना काही आजार संभवतात. हे आजार स्पष्ट समजण्यासाठी काही तपासण्यांचा उपयोग होतो. मधुमेहासाठी रक्ततपासणी, रक्तदाब, जननसंस्थेची कर्करोगासाठी तपासणी, पोटाची सोनोग्राफी, इ. तपासण्या करता आल्यास काही आजार लवकर समजू शकतात. याच काळात शरीरातली हाडे ठिसूळ व्हायला सुरुवात होते.
पाळीच्या वेळचे दुखणे आणि आयुर्वेद

सामान्यपणे होणारा त्रास उपचाराने कमी होतो. अशा स्त्रियांच्या बाबतीत सर्वात आधी मलबध्दतेची चौकशी करावी. मलावरोधाची सवय असल्यास केवळ विरेचक औषधांनी पाळीच्या वेदना कमी होतात. यासाठी त्रिफळा चूर्ण पाळीच्या आधी दोन-तीन दिवसांपासून द्यावे. सौम्य विरेचन लागत असल्यास मोरावळा किंवा आवळा द्यावा.

या दुखण्यावर दुसरा उपाय म्हणजे हिंग भाजून त्याची पूड दोन गुंज, जिरेपूड दोन गुंज गुळाबरोबर द्यावी. कृमींमुळे दुखत असल्यास वावडिंग पावडर, आवळकाठी कोमट पाण्याबरोबर द्यावी.

कष्टामुळे (व्यायाम, श्रम) पाळीच्या वेळी दुखते असे दिसून आल्यास तेलाची भिजवलेली (कोणतेही तेल, गोडे, तीळ, एरंड, खोबरे, इ.) कापडाची घडी ओटीपोटावर अर्धा तास ठेवावी. पाळीच्या आधी दोन-तीन दिवसांपासून हा उपाय करावा. याबरोबर दशमुळाचा काढा सकाळी व निकाढा रात्री रोज दोन महिने (फक्त पाळीचे दिवस वगळून) द्यावा. दशमूलारिष्ट तयार मिळते. दशमुळे पाळीच्या सर्व दुखण्यांमध्ये वापरायला हरकत नाही. (दशमुळे-बेल, शिवणमूळ, ऐन, पाडळमूळ, टेंटमूळ, सालवण, पिठवण, रिंगणी, डोरली,गोखरू) केवळ दशमूलारिष्टामुळे काही प्रमाणात तरी आराम मिळतो. मात्र योनिभागी जखम किंवा योनिमार्गाची आग होत असेल किंवा गर्भाशयाच्या तोंडावर सूज असेल तर दशमूलारिष्ट देऊ नये; त्यामुळे त्रास वाढतो.

मलावरोध हे कारण नसेल आणि अवयवातच दोष असण्याची शक्यता असेल तर तज्ज्ञाकडे पाठवावे. चंद्रप्रभावटी, महावातविध्वंस,महायोगराजगुग्गुळ,सुवर्णराजवंगेश्वर यांपैकी योग्य औषधांची निवड केली जाते. वेदना फार असल्यास 5 तोळे (50 ग्रॅम) तीळतेलाची बस्ती द्यावी.
होमिओपथी निवड

आर्निका, आर्सेनिकम, बेलाडोना, कल्केरिया कार्ब, चामोमिला, फेरम फॉस, हेमॅमेलिस,लॅकेसिस, लायकोपोडियम, मर्क्युरी सॉल, नक्स व्होमिका, फॉस्फोरस, फायटोलाका,पल्सेटिला, सेपिया, सिलिशिया, स्ट्रॅमोनियम, सल्फर.

पाळीला जास्त रक्त जाणे

अवनतशिरस्कासन हे आसन करण्यास सांगावे. (एक मिनिट -रिकाम्या पोटी,सकाळी).

याबरोबर पोटातून अशोकाच्या (पस-या अशोक) सालीचा काढा (10ग्रॅम भरड पावडर) व निकाढा रोज सकाळ-संध्याकाळ याप्रमाणे दोन महिने घ्यावा. रक्तस्रावाबरोबर फार वेदना असतील तर काढयाबरोबर तूप किंवा तेल द्यावे म्हणजे वेदना कमी होतील.

किंवा ज्येष्ठमध + अडुळसा + अनंतमूळ + मंजिष्ठा पावडर पाण्यातून द्यावे. अशोकाची साल न मिळाल्यास जांभूळ, आंबा यांची आंतरसाल चालू शकते. किंवा

रक्तस्राव लगेच थांबविण्यासाठी असली नागकेशर + खडीसाखर + लोणी द्यावे. शतावरी + ज्येष्ठमधचूर्ण हे मिश्रण साखरपाण्यातून द्यावे.
पाळी थांबताना होणारा त्रास

1. दशमूलारिष्ट किंवा निकाढा महिनाभर पोटातून द्यावा.

2. याऐवजी केवळ अशोकाचा काढा किंवा निकाढा चालू शकेल.

3. अशक्तपणा असल्यास लोह पुरवठा करावा लागतो. यासाठी ताप्यादी लोह किंवा धात्रीलोह वापरावे. रोज एक-एक गोळी एक महिनाभर द्यावी.

पाळी थांबण्याची प्रक्रिया एक-दोन वर्षे चालते. वरील औषधे एकेक महिना अंतराने द्यावीत म्हणजे सवय लागणार नाही.

4. शतावरी, अश्वगंधा, बाळंतशेपा, किंवा सालमिस्त्री, सफेद मुसळी यांची पावडर दुधाबरोबर द्यावी.

स्त्रीरोगांमध्ये संप्रेरकांचा उपचार

स्त्री संप्रेरकांचा संततीप्रतिबंधक वैद्यकीय वापर अनेक दशके जुना आहे. आता ही संप्रेरके वनस्पतींपासून तयार केली जातात. वैद्यकीय प्रगतीमुळे त्यांचा वापर आता अधिकाधिक नेमकेपणाने होत आहे. गोळया इंजेक्शनांबरोबरच औषधी कॉपर-टी, त्वचेवर चिकटपट्टी, मलम असेही प्रकार आता वापरात येत आहेत. हे सर्व उपचार तज्ज्ञांकडूनच व्हायला पाहिजेत. मात्र माहितीसाठी थोडक्यात संप्रेरक-उपचार खालीलप्रमाणे आहेत.
इस्ट्रोजेन (E)

1. पाळी थांबताना होणारी इस्ट्रोजेन कमतरता दुरुस्त करण्यासाठी

2. शरीरातलापाळी थांबल्यानंतर होणारा हाडांचा विरळपणा रोखण्यासाठी

3. संततीप्रतिबंधक - यामध्ये इस्ट्रोजेनमुळे स्त्रीबीज सुटायचे थांबते.

4. पाळीचा जादा रक्तस्राव रोखण्यासाठी.

5. पुरुषाच्या प्रोस्टेटच्या कर्करोगात.
प्रोजेस्टेरॉन (P)चे उपयोग

1. गर्भपात टाळण्यासाठी, थांबवण्यासाठी

2. गर्भाशयाच्या कर्करोगाला रोखण्यासाठी

3. संततीप्रतिबंधक

4. पाळीचा जादा रक्तस्त्राव रोखण्यासाठी

5. पाळीचा तणाव कमी करण्यासाठी

6. पाळी येत नसल्यास.

7. तातडीक संततीप्रतिबंधक गोळी (लैंगिक संबंधांनंतर 72 तासात)

8. पाळी 4-5 दिवस लांबवण्यासाठी
स्त्रीबीज - सूचना : स्वयंतपासणी

स्त्रियांना काही प्रमाणात स्वयंतपासणी करून स्वतःच्या जननचक्रासंबंधी अंदाज घेता येतो. हे काम फारसे अवघड नाही, थोडया प्रशिक्षणाची त्यासाठी गरज आहे. एवढयावरून स्वतःच्या शरीरात चाललेल्या काही घडामोडी- स्त्रीबीज सुटणे, फलन, सुरक्षितकाळ वगैरे ज्ञान होऊ शकते.
गर्भाशयाच्या तोंडावरचा चिकटा तपासणे

गर्भाशयाच्या तोंडावर शेंबडासारखा पदार्थ असतो हे आपल्याला माहिती असेल. स्वतःच्या बोटाने हा चिकटा बाहेर काढून पाहता येईल. हा चिकटा पाळीच्या चक्राप्रमाणे,आणि गर्भधारणेप्रमाणे बदलतो. जेव्हा स्त्रीबीज बीजांडातून मोकळे होते (दोन पाळयांच्या मधोमध) तेव्हा हा चिकटा अगदी पारदर्शक, पातळ, लवचीक असतो. दोन बोटांत हा चिकटा ताणल्यावर त्याची तार लांबते व ती तुटत नाही. हा आहे सुफल चिकटा. या एक-दोन दिवसांत पुरुषाशी लैंगिक संबंध आला तर गर्भधारणा होऊ शकते. पुरुष शुक्रबीजाला आत प्रवेश मिळावा म्हणून निसर्गत: चिकटा असा पातळ व पारदर्शक होतो.

याउलट पाळीच्या सुरुवातीस व शेवटी गर्भधारणेचा काळ नसतो, यावेळी चिकटा अगदी घट्ट, आणि पांढरट असतो. बोटाने ताणल्यास याची तार तुटून जाते. या घट्ट चिकटयातून पुरुषबीज सहसा गर्भाशयात शिरू शकत नाही.

चिकटयाचे हे बदल बदलत्या स्त्रीसंप्रेरकांवर अवलंबून असतात.
इतर खुणा

स्त्रीबीज मोकळे होताना ओटीपोटात चमकल्याप्रमाणे थोडीशी वेदना जाणवू शकते. या दिवशी शरीराचे तपमान थोडे वाढते, पण यासाठी विशेष प्रकारचा तापमापक वापरावा लागतो.

स्त्रीबीज मोकळे होताना आणखी एक गोष्ट घडते ती म्हणजे गर्भाशयाचे तोंड मऊ होते व वर ओढले जाते. इतर वेळेस ते थोडे खाली येते व नाकाच्या शेंडयाप्रमाणे निबर लागते.

स्त्रीबीज मोकळे होण्याच्या काळात स्तनांमध्ये पण थोडी संवेदना होते. या 1-2दिवसांत स्त्रीची लैंगिक इच्छा जास्त होते, इतर काळात ती थोडी ओसरते असा अनेकजणींचा अनुभव आहे.

या काही सूचनांवरून स्त्रीबीज कधी सुटते व कधी नसते हे कळणे सहज शक्य आहे. आपल्या घरात, एक आरसा व प्रकाशाच्या साह्याने, कुस्कोसारखा प्लॅस्टिक चिमटा वापरून स्वयंतपासणी करायला फार अडचण नसते. स्वतः शिका व इतरांना हे तंत्र शिकवण्याचा प्रयत्न करा.


लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

solved 5
wordpress 5 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info