अगदी सुरुवातीला बाळ किती वेळ झोपते?pregnancytips.in

Posted on Wed 12th Oct 2022 : 10:09

बाळाची झोप आणि आरोग्य : तान्ह्या बाळांनी किती झोपणं आवश्यक असतं? झोप आणि वाढीचा संबंध असतो का?
नेहमी चांगलं झोपणारं बाळ अचानक धड झोपत नाही, अशी भीती वास्तवाला धरून नाही. रात्री जाग येणं अगदी सर्वसाधारण आहे आणि त्याने 'SIDS' (एudden Infant Death Syndrome) पासून संरक्षण लाभतं. बारा तास झोपणं, ही काही आदर्श स्थिती नव्हे. बालकांच्या झोपेसंदर्भात वैज्ञानिकांचं म्हणणं काय आहे, ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न

'तुमचं मूल नीट झोपतं का?'

तुम्हाला मूल असेल तर जवळपास प्रत्येक व्यक्ती हा प्रश्न तुम्हाला विचारतेच विचारते.

विशेषतः पाश्चात्त्य देशांमध्ये झोपेविषयी प्रशिक्षण देणाऱ्यांचा, या संदर्भातील पुस्तकांचा आणि लेखांचा बाजारच सुरू झालेला आहे.

बाळाने स्वतःच्या पाळण्यामध्ये वा क्रिबमध्ये रात्रभर एकट्याने झोपावं आणि दिवसभरात अनेक दीर्घ डुलक्या काढाव्यात ही एक तथाकथित आदर्श परिस्थितीची कल्पना आहे आणि त्यापाठीमागे लोक पळत आहेत.

हे उद्दिष्ट गाठता आलं नाही, तर मुलांना वाढीसाठी आवश्यक झोप मिळण्याची शक्यता कमी होते, असा इशारा बालरोगतज्ज्ञही पालकांना देऊ लागले आहेत.

बाळाच्या आहाराबाबत आईकडून होणाऱ्या 4 चुका कोणत्या? पूरक आहाराचे महत्त्व काय?
लहान मुलांना कांजिण्या झाल्यावर अशी घ्या काळजी, पाळा 'ही' पथ्यं
बाळाला पारंपरिक पद्धतीने मालिश करणं फायद्याचं की धोकादायक?

परंतु, बालकाने आईवडिलांहून अंतर राखून, अखंड झोप घ्यावी, ही कल्पना अजिबातच सार्वत्रिक स्वरूपाची नाही. शिवाय, आपल्या प्रजातीच्या इतिहासामध्ये मानवी बालकं ज्या तऱ्हेने झोप घेत आली आहेत, त्याच्याशी हे उद्दिष्ट सुसंगतही नाही. किंबहुना, याचा अवाजवी बाऊ केला, तर पालकांना त्यातून चिंता व ताण सहन करावा लागू शकतो- किंबहुना मुलांसाठीदेखील ते असुरक्षित ठरू शकतं.

"उत्क्रांतीच्या अर्थाने विचार केला तर, आज एकविसाव्या शतकात आपण ज्या तऱ्हेने झोपतो ते खूपच विचित्र आहे. आपण काही मेल्यासारखं आठ तास झोपण्याच्या दृष्टीने उत्क्रांत झालेलो नाही. अजिबात जाग न येता, पूर्ण शांततेत आणि पूर्ण अंधारात झोपायचं- हा उत्क्रांतीतून आलेला टप्पा नव्हे," असं डरहॅम विद्यापीठातील मानवशास्त्राच्या प्राध्यापक आणि डरहॅम इन्फन्सी अँड स्लीप सेंटरच्या संचालिक हेलन बॉल सांगतात.

"परंतु, पाश्चात्त्य समाजांमधील लोकांना याची सवय झाली आहे, आणि मुलांना काय करता यायला हवं आणि त्यांना कशा पद्धतीने वागवलं पाहिजे, याबद्दलच्या आपल्या विचारावरही याचा परिणाम होतो."
झोप पुरेशी होते ना?

मुलांची झोप पुरेशी होते की नाही, याबद्दल वाटणारी काळजी नवीन नाही. नवजात बालकांनी दिवसाकाठी 22 तास झोपायला हवं, अशी शिफारस एका रशियन डॉक्टरने लंडनस्थित 'समकालीन विज्ञान माले'तील झोपेवरच्या पुस्तकातून केली होती, तेव्हा 1897 साली या संदर्भात पहिल्यांदा 'वैज्ञानिक' मार्गदर्शक तत्त्वं प्रसिद्ध करण्यात आली.

त्यानंतरच्या शतकामध्ये हा झोपेचा कालावधी कमी झाला, पण मुलांना प्रत्यक्षात जितकी झोप मिळत होती, त्यापेक्षा सुमारे 37 मिनिटं जास्त झोपेची शिफारस ही मंडळी करत होती. त्यामुळे पालकही चिंतातुर होणं ओघानेच आलं.

बालकांसाठी आणि लहान मुलांसाठी (किंबहुना, प्रौढांसाठीसुद्धा) झोप अत्यंत महत्त्वाची असते, यावर तज्ज्ञांमध्ये सहमती आहे. झोपेचा अभाव असेल, तर हृदय व चयापचय या संदर्भातील जोखीम वाढते, एकाग्रता कमी होण्याचा धोका वाढतो आणि आकलनक्षमताही मंदावते, त्याचप्रमाणे भावनांवरील नियंत्रण कमी होणं, अभ्यासातील कामगिरी व जीवनमान खालावणं असेही परिणाम संभवतात.

अर्थात, या निष्कर्षांचा संबंध मुख्यत्वे बालकांशी नसून शालेय वयातील मुलांशी आहे. शिवाय, या निष्कर्षांमध्ये सहसंबंधांचा निर्देश केलेला आहे, त्यात कार्यकारणभाव सिद्ध करून दाखवलेला नाही. विशिष्ट प्रमाणात झोप घेतल्याने (किंवा न घेतल्याने) एकाग्रता कमी होण्यासारख्या काही विशिष्ट स्थिती उद्भवतात.

रात्रभर सातत्याने कमी झोप घेतलेली मुलं आणि एकाग्रतेचा अभाव यांच्यातला संबंध संशोधनाद्वारे सुचवण्यात आला असला, तरी ते प्रत्यक्षात सिद्ध होण्यासाठी नियंत्रित वातावरणात यादृच्छिक पद्धतीने अभ्यास करावा लागेल. त्यासाठी अनेक वर्षं कमी झोप मिळालेल्या मुलांचा एक गट लागेल. असं करणं अर्थातच अनैतिक होईल. त्यामुळे प्रत्यक्षात कमी झोपणाऱ्या मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव असतो की एकाग्रतेचा अभाव असणारी मुलं कमी झोपतात, याचा शोध घेणं अवघड आहे.

झोप आणि विकास यांच्यातील संबंध दुहेरी मार्गक्रमणा करत असण्याची शक्यता आहे. अल्पकालीन नियंत्रित स्वरूपाच्या यादृच्छिक चाचण्यांमधून असं आढळलं की, बालकांनी डुलकी काढली असेल तर स्मरणशक्तीशी संबंधित कामात त्यांची कामगिरी चांगली झाली आणि थकलेल्या बालकांना सजग बालकांपेक्षा तणावग्रस्त प्रसंगाला सामोरं जायला जास्त अवघड जात होतं.

मुलांना झोप येऊ नये यासाठी आपण काही करायला नको (म्हणजे जाणीवपूर्वक मुलांना जागं राहण्याची सक्ती करणं, इत्यादी) असा याचा अर्थ होतो, असं वाटू शकतं; पण प्रत्येक बालकाला रात्री 12 तासांची अखंड झोप गरजेची असते किंवा दिवसात अनेकदा दोन तासाच्या झोपा गरजेच्या असतात, असं नाही.

"झोपेच्या बाबतीत प्रौढ व्यक्तींच्या सवयी वेगवेगळ्या असतात, तसंच बालकांच्या बाबतीत असतं," असं अॅलिस ग्रेगरी म्हणतात. लंडनमधील गोल्डस्मिथ्स विद्यापीठात त्या झोप या विषयातील तज्ज्ञ अशा मानसशास्त्राच्या प्राध्यापक आहेत आणि त्यांनी 'नॉडिंग ऑफ: द सायन्स ऑफ स्लीप' हे पुस्तक लिहिलं आहे.

तीन महिन्यांपर्यंतच्या बालकांनी 24 तासांच्या कालावधीत 14-17 तास झोपायला हवं, अशी शिफारस अमेरिकेतील नॅशनल स्लीप फाउंडेशनने केल्याचं त्या सांगतात. पण किमान 11 किंवा जास्तीतजास्त 19 तासांची झोपही पुरेशी असते, असं त्या नमूद करतात. दरम्यान, अमेरिकन अकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिनने चार महिन्यांखालील बालकांसाठी झोपेच्या बाबतीत काहीही शिफारस केलेली नाही.
बालक
"बालवयातील झोपेसंदर्भात आघाडीच्या तज्ज्ञांमध्येही मतभेद आहेत, हे या किंचित वेगवेगळ्या मार्गदर्शक तत्त्वांवरून दिसून येतं," असं ग्रेगरी म्हणतात. मुलं प्रत्यक्षात कसं झोपतात, हे पाहिलं तर यातील फरकाचं प्रमाणही स्पष्ट होतं. ऑस्ट्रेलियातील एका अभ्यासानुसार, 554 चार ते सहा महिने वयोगटातील मुलांची 24 तासांमधील सरासरी झोप 14 तासांची होती.

पण या आकडेवारीचा सखोल विचार केला, तर सर्वाधिक झोप घेणाऱ्या आणि सर्वांत कमी झोप घेणाऱ्या बालकांमधील झोपेच्या कालावधीत आठ तासांहून अधिक तफावत असल्याचं दिसतं.

"98 टक्के विरुद्ध दोन टक्के अशा टोकांमध्ये झोपेतील कालावधी वेगवेगळा असल्याचं दिसून आलं आहे," असं या अभ्यासाच्या एक लेखक हॅरिएट हिस्कॉक म्हणतात. त्या रॉयल चिल्ड्रन्स हॉस्पिटल मेलबोर्नमध्ये बालरोगतज्ज्ञ आहेत.
वेळापत्रकानुसार झोप

दिवसभरात झोपेचं (आणि खाण्याचं) वेळापत्रक बसवलं तर? किंवा रात्री सात ते सकाळी सात या कालावधीपुरतं वेळापत्रक पाळलं तर? असं करणं आदर्श असतं, असं मुलांच्या झोपेवरील असंख्य पुस्तकांमध्ये म्हटलेलं आहे आणि अनेक प्रशिक्षकही तसं म्हणतात.

सुरुवातीच्या दिवसांमध्ये असं नियमित वेळापत्रक पाळणं विशेष अवघड जाऊ शकतं. कारण, रात्री झोपायची वेळ असते, हे प्रौढ व्यक्तींना त्यांच्या शारीरिक प्रक्रियांवरून कळतं- उदाहरणार्थ मेलाटोनिन स्त्रवत, शरीरातील तापमानाची लयही बदलते. पण मूल किमान आठ ते अकरा आठवड्यांचं होत नाही तोपर्यंत अशा प्रकारची लय शरीराला प्राप्त झालेली नसते.

दिवसाच्या वेळी प्रकाश दाखवणं आणि रात्रीच्या वेळी अंधार दाखवणं, हा मुलांमध्येही अशी लक्षणं रुजवण्याचा उपयुक्त मार्ग आहे. (झोपेविषयीचे काही प्रशिक्षक निराळा दावा करत असले, तरी बालकांमध्ये दिवसाच्या वेळात मेलाटोनिन स्त्रवत नाही. तसं झालं तर त्यांची चोवीस तासाची लय बिघडेल.)

"झोप व जागेपणा यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या दोन प्रक्रिया आहेत, असं झोप नियमनाच्या मुख्य सिद्धान्तात म्हटलं आहे," असं ग्रेगरी सांगतात."पहिली प्रक्रिया होमिओस्टॅटिक असते (आपण जितका जास्त वेळ जागे राहू तितकी आपल्याला झोप जास्त येते, असं यात मानलं जातं), आणि दुसरी प्रक्रिया सिर्साडियन असते (घड्याळानुसार चालणाऱ्या या प्रक्रियेत दिवसाच्या व रात्रीच्या विशिष्ट वेळी आपल्याला झोप येते किंवा जागं राहावं वाटतं)."

"बालकांमध्ये या दोन्ही प्रक्रिया पुरेशा विकसित झालेल्या नसतात, त्यामुळे प्रौढांच्या तुलनेत बालकांच्या झोपेत तफावत आढळते."

जागतिक संदर्भात संध्याकाळी सात वाजता झोपणं खूपच एककल्ली वाटू शकतं. अनेक संस्कृतींमुळे बालकं व मुलं उशिरा झोपी जातात- मध्यपूर्वेत रात्री सुमारे पावणे अकरा वाजता, आशियात पावणेदहा वाजता, तर इटलीत दहा वाजता मुलं झोपत असल्याचं दिसतं. उठण्याच्या वेळाही अशाच भिन्न असतात.
लवकर झोपी गेलं तर अभ्यासात चांगली कामगिरी होते आमि लठ्ठपणाचा धोका कमी होतो, असं काही अभ्यासांमध्ये नमूद केल्याचं दिसतं. पण शाळेत जायच्या वयापूर्वीच्या आणि मोठ्या वयाच्या मुलांचा यात समावेश होता, बालकांचा समावेश नव्हता. शिवाय, मूलतः झोपेमुळेच हे घडतं का, हेही अस्पष्ट आहे. मुलांची शाळा आणि इतर नित्यक्रम दिवसा लवकर सुरू होतो, त्यामुळे लवकर झोपी जाणाऱ्या मुलांना एकूण जास्त झोप मिळणं स्वाभाविक असतं.

लहान मुलांमध्ये मेलाटोनिन स्त्रवतं का, याबद्दलचा पुरावा मर्यादित स्वरूपाचा आहे. आपल्याला झोपेच्या दिशेने नेणारं हे 'काळोखाचं हार्मोन' प्रौढ व्यक्तींमध्ये संध्याकाळीच स्त्रवायला लागतं. पण लोकांना वाटतं तितकं आधीपासून हे स्त्रवणं सुरू होत नाही.

ऱ्होड आयलंडवरील प्रोव्हिडन्स इथे एक लहानसा अभ्यास झाला, त्यानुसार- अमेरिकेत मुलांना लवकर झोपवण्याकडे कल असला, तरी सरासरी बालकाच्या शरीरात संध्याकाळी पावणेआठ वाजेपर्यंत मेलाटोनिन स्त्रवत नाही.

शिवाय, डुलक्या काढल्यानेही मेलाटोनिनचं स्त्रवणं लांबण्याची शक्यता असते. हार्मोन स्त्रवणं ही एक प्रक्रिया असते, आत्ता लगेच सुरू आणि मग लगेच बंद अशा पद्धतीने ते होत नाही. त्यामुळे पावणेआठला स्त्रवणं सुरू झालं म्हणून तेव्हाच झोप येईल असं नाही. झोप नंतरही येऊ शकते.

काही कुटुंबांच्याबाबतीत संध्याकाळी सात वाजता झोपून सकाळी सात वाजता उठणं हे वेळापत्रक उत्तम ठरतं. पण त्याची सक्ती करू पाहणाऱ्यांना इतरांना मात्र झोपेच्या नवीन समस्या सतावू शकतात.

"शारीरिकदृष्ट्या पूरक नसणाऱ्या वेळेत बालकांना झोपायला लावलं, तर ते झोपायला तयार होत नाही आणि प्रतिकार करतात, असं आमच्याकडील आकडेवारीवरून दिसतं," असं ऱ्होड आयलंडवरच्या अभ्यासात सहभागी संशोधक लिहितात.

तुमच्या बालकाला रोज रात्री पूर्ण 12 तासांची झोप गरजेची नसेल, तरीही तुम्ही तिला वा त्याला सकाळी सात वाजेपर्यंत झोपवून ठेवलं, तर त्याचे काही अनिष्ट परिणाम होऊ शकतात- उदाहरणार्थ, रात्री मूल बराच वेळासाठी मधेच उठून बसू शकतं किंवा खूपच लवकर उठू शकतं.

ठरलेल्या वेळी दूध देण्याऐवजी, बालकाच्या झोपेच्या संकेताना प्रतिसाद देऊन दूध देणं, हा झोपेविषयीचा अधिक लवचिक दृष्टिकोन असू शकतो. युनायटेड किंगडममधील नॅशनल हेल्थ सर्व्हिस, युनिसेफ, पालकत्वाबाबत काम करणारी स्वयंसेवी संस्था एनसीटी आणि अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडिअॅट्रिक्स यांसारख्या संस्थांनी अशाच प्रकारे बालकांच्या प्रतिसादानुसार दूध पाजण्याची शिफारस केली आहे- मग दूध अंगावरचं असो वा बाटलीतलं असो.

पालकांनी लादलेल्या काटेकोर वेळापत्रकापेक्षा मुलांच्या कलाने या गोष्टी करण्याचे काही लाभ असतात, असं अभ्यासांवरून सूचित होतं.

उदाहरणार्थ, पालक त्यांच्या मुलांना नियंत्रित पद्धतीने दूध वा जेवण देत असतील, तर त्या बालकाचे वजन खऊप जास्त वाढलेलं असण्याची किंवा खूप कमी असण्याची शक्यता जास्त असते. त्याचा अंगावर दूध पाजण्यावरही परिणाम होऊ शकतो- बाळ संकेत देईल त्याला प्रतिसाद देत दूध पाजणं हा दुधाचा पुरवठा सुरळीत करण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे.

अंगावरचं दूध देणं लवकर थांबवण्याचा आणि दूध पाजण्याचं वेळापत्रक ठरवण्याचा संबंध असतो. काटेकोर झोप आणि दूध पाजण्याची वेळापत्रकं बसवणं, असे सल्ले देणारी पुस्तकं वाचणाऱ्या माता तसंही अंगावर दूध पाजण्याची शक्यताच कमी असते.

"नित्यक्रम हवाहवासा वाटणाऱ्या माता अंगावर दूध पाजणं थांबवत असतील, किंवा नित्यक्रमामुळे दुधाचा पुरवठआ कमी होत असेल," असं युनायटेड किंगडममधील स्वॅनसी विद्यापीठातील सार्वजनिक आरोग्य या विषयाच्या प्राध्यापक अॅमी ब्राउन म्हणतात.
बालक

फोटो स्रोत, Getty Images

बालकाच्या गरजांचं निरीक्षण करून त्यानुसार पुढे जाण्याचा पालकांच्या मानसिक आरोग्यालाही लाभ होऊ शकतो. पालकांच्या पुढाकाराने बसवलेला नित्यक्रम मातांमध्ये अधिक चिंताग्रस्तता निर्माण करत असल्याचं निदर्शनास आलं आहे.

ब्राउन यांनी सहलेखन केलेल्या दुसऱ्या एका अभ्यासानुसार, काटेकोर नित्यक्रमाचं समर्थन करणाऱ्या पुस्तकांचा वापर करणाऱ्या मातांना त्या निराश आहेत, तणावाखाली आहेत व पालकत्वाच्या क्षमतांचा आपल्यात अभाव आहे, असं वाटण्याची शक्यता जास्त असते.

मुळात हे इतकं गुंतागुंतीचं असण्याची गरज नाही, असं झोपेविषयीचे संशोधक म्हणतात. कोणत्याही बालकासाठी कितपत झोप पुरेशी आहे, हे जाणून घेण्यासाठी त्या बालकाचा विचार करावा.

"तुमचं मूल दिवसभरात साधारणपणे आनंदी असेल, तर ते ठीकठाक आहे असं मानायला हरकत नाही. ते चिडचिड करत असतील, त्रस्त होत असतील, तर कदाचित झोप हे त्यामागचं कारण असू शकतं, असं मी कायमच पालकांना सांगतो," असं हिस्कॉक म्हणतात.
रात्रभर झोप

विशिष्ट तास झोप घेणं पुरेसं वाटत नाही म्हणूनच की काय अनेक पालक आणखी एक उद्दिष्ट समोर ठेवतात: बालकाला 'गाढ' झोप लागायला हवी.

बालकाच्या विकासासाठी अशी गाढ झोप चांगली असते, असं झोपेविषयीचे प्रशिक्षक व संबंधित पुस्तकं सांगतात. पण 12 तास अखंड झोप घेणं, हे सर्वोच्च उद्दिष्ट असेल, तर ते जैविकदृष्ट्या आव्हानात्मकसुद्धा आहे. यशस्वी झालं तरी हे उद्दिष्ट बालकांसाठी धोकादायक असतं.

सर्व माणसं झोपेदरम्यान उठतात. प्रौढ व्यक्तींच्या सर्व गरजा भागल्या असतील (म्हणजे पांघरुण पुरेसं असेल किंवा लघवीला जायला लागणार नसेल) आणि आपण निवांत असू (म्हणजे कामाची किंवा दुसऱ्या काही वादविवादाची चिंता नसेल), तर आपण अंधुक जाग आली तरी आपण लगेच झोपी जातो. त्यामुळे आपल्यापैकी बहुतेकांना रात्री आलेली जाग सकाळी लक्षात राहात नाही.

पण, प्रौढ माणसांचं झोपेचं चक्र लांब- सुमारे 90 मिनिटं असतं. बालकांचं झोपेचं चक्र याच्या अर्ध्या कालावधीचं असू शकतं. बालकांना प्रौढांप्रमाणे स्वतःच्या गरजा भागवता येत नाहीत, त्यामुळे ती अनेकदा खडखडीत जागी होतात.
झोपलेलं बाळ

फोटो स्रोत, Getty Images

दुधासाठी बाळ उठणं, हे अगदी उघड दिसणारं उदाहरण आहे. इतर वानरवंशीय प्राण्यांच्या तुलनेत मानवांचा मेंदू मोठा असतो, पण जननमार्ग मात्र लहान असतो. दोन पायांवर चालताना तोल राहावा, या दृष्टीने बहुधा हे घडलं असावं. त्यामुळे माणसांची बाळं इतर सस्तन प्राण्यांच्या तुलनेत मज्जासंस्थेच्या दृष्टीने कमी प्रगल्भावस्थेत जन्माला येतात. नवजात अर्भकाच्या मेंदूचा आकार प्रौढ व्यक्तीच्या मेंदूपेक्षा एक तृतीयांश असतो.

याचा अर्थ मानवी नवजात अर्भकांना जन्मानंतर वेगाने विकसित व्हायला खूप ऊर्जा लागते. शिवाय, ते तुलनेने असहाय असतात, काळजी घेणाऱ्या व्यक्तीचं सतत जवळ असणं त्यांच्यासाठी आवश्यक ठरतं. त्यामुळे बाळाला तृप्त करेल, परिणामी त्यांना जास्त वेळ एकटं राहणं शक्य होईल, अशा जास्त मेद असलेल्या अन्नापेक्षा पटकन पचणारं आणि वारंवार खावं लागणारं जास्त साखर असणारं अंगावरचं दूध त्यांना हवंसं वाटतं. शिवाय, नवजात अर्भकांचं पोट लहानसं असतं, त्यात एका वेळी केवळ 20 मिलीलीटर एवढंच दूध राहतं, त्यामुळे त्यांना दिवस-रात्र वारंवार दूध पाजावं लागतं.

"लहान बाळं जागी होतात, कारण त्यांना दूध हवं असतं," असं ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील स्कूल ऑफ नर्सिंगमधल्या प्राध्यापिका वेंडी हॉल म्हणतात. बराच काळ त्या लहान मुलांच्या झोपेवर संशोधन करत आहेत.

"हळुहळू मुलांना रात्री झोपण्यासाठी आवश्यक अधिक दीर्घ जैविक कालावधी मिळवणं शक्य होऊ लागतं. तीन महिन्यांमध्ये, सर्व काही योग्य रितीने केलं तर, हा कालावधी पाच ते सहा तासांपर्यंतचा होतो."

"पण याचा अर्थ त्यांना दूध पाजण्यासाठी रात्रीतून दोनदा वा तीनदा उठावं लागतंच. फक्त त्यांचा झोपेचा एका वेळचा पल्ला वाढतो."

बाळं मोठी होतात, तसतसं दूध पाजण्याचं प्रमाण कमी होतं. सहा महिन्यांचं झाल्यावर सुदृढ, सर्वसामान्य वजनाच्या बाळांना रात्री दूध 'गरजे'चं उरत नाही, असं अनेक झोपेविषयीचे संशोधक सांगतात. (स्तनपानविषयक तज्ज्ञ मात्र याच्याशी बहुतेकदा असहमत असतात. त्यांच्या मते सहा महिन्यांनंतरही मूल दुधासाठी झोपेतून उठतं). पण इतर कारणांसाठी काळजी घेमारी व्यक्ती जवळ लागणं आणि जाग येणं हे सर्रास घडतं.

विशेषतः बाळाच्या पहिल्या वर्षाच्या कालावधीत हे जास्त घडतं. या काळात मुलं जास्त असुरक्षित असतात आणि त्यांची चेतासंस्था पुरेशी प्रगल्भ झालेली नसते. अलीकडे 5700 फिनिश मुलांच्या एका अभ्यासात असं आढळलं की, तीन महिन्यांच्या बाळांना दिवसाला सरासरी 2.2 वेळा जाग येते. ही संख्या शून्य ते 15 इथपर्यंत कितीही असू शकते. बाळाच्या पहिल्या वर्षभरात हे दिसून येतं.

आपली मुलं आठवड्यात सरासरी पाच रात्रींना जागी होतात, असं तीन महिन्यांच्या व आठ महिन्यांच्या 80 टक्के पालकांनी सांगितलं. बारा महिन्यांनी यात नाट्यमय बदल झाला. अठरा महिन्यांच्या दोन तृतीयांश मुलांना आणि दोन वर्षांच्या जवळपास तीन चतर्थांश मुलांना रात्री जाग येत नव्हती. दोन वर्षांचं होईपर्यंत झोपेची गुणवत्ता 'बरीच वेगवेगळी' असते, असंही या अभ्यासात निदर्शनास आलं.

इतर अभ्यासांमधूनही अशाच प्रकारचे निष्कर्ष निघालेले आहेत. मोठ्या बाळांमध्ये व अगदी चालू लागलेल्या मुलांमध्येसुद्धा रात्री झोपेतून जागं होणं स्वाभाविक असलं, तरी सतत, खूप वेळासाठी जाग येत असेल, तर मात्र वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक असतं.
जाग येणं गैर नाही

मुलं स्वतःच्या संरक्षणासाठीसुद्धा वारंवार जागी होतात.

गाढ झोपेत असलेल्या मुलांच्या बाबतीत "सडन इन्फन्ट डेथ सिन्ड्रोम"चा एक संभाव्य धोका असतो. अशा वेळी बाळांचा श्वासोच्छवास अचानक थांबतो. पण सुदृढ बालक लगेच जागं होतं. इतर काही धोकादायक घटक आधीच अस्तित्वात असतील (म्हणजे मेंदूमध्ये काही विकार असेल) तर बाळ अशा टप्प्यावरही जागं होत नाही.

मुलांना लवकरच जास्त वेळेसाठी व गाढ झोपण्याची सक्ती केली, तर अशा रितीने अचानक झोपेत मृत्यू ओढण्याचा धोका वाढतो, असं नॉट्र डॅम विद्यापीठात मदर-बेबी बिहेव्हिअरल स्लीप लेबॉरेटरीचे संस्थापक-संचालक जेम्स मॅककेना म्हणतात.

मुलांना पालथं झोपवणं, हे याचं सर्वांत वाईट उदाहरण आहे. अशाने मुलं गाढ झोपायला मदत होते असं वाटत असलं, तरी झोपेत अचानक मृत्यू ओढवण्याचा धोका 13 पटींनी वाढतो. मुलांना पाठीवर झोपवावं, यासाठी जगभरात अभियानं झाली, तेव्हा अशा प्रकारे होणाऱ्या मृत्यूंचा दर खाली आला.
झोपलेलं बाळ

फोटो स्रोत, Getty Images

जाग न येता दीर्घ काळ, गाढ झोपणं बाळांच्या वाढीसाठी चांगलं असतं का? असा समज सर्रास आढळत असला, तरी संशोधनाचा याला आधार नाही.

झोपेविषयी संशोधन करणाऱ्या जोडी मिंडेल यांनी 18 महिन्यांच्या कालावधीत 117 बाळं आणि चालू लागलेली मुलं यांचं नियमित टप्प्याने निरीक्षण केलं. "झोप आणि बोधात्मक विकास यांच्यात काहीही वास्तविक संबंध नाही, असं आम्हाला अमेरिकेत केलेल्या या अभ्यासात आढळलं," असं मिंडेल सांगतात.

चिल्ड्रन्स हॉस्पिटल ऑफ फिलाडेल्फियामध्ये स्लीप सेंटरच्या त्या सहायक संचालक आहेत. किंबहुना, रात्री जास्त जाग येणं आणि चांगले बोधात्मक परिणाम, यांचे माफक संबंध असल्याचं त्यांच्या टीमला आढळलं.

कॅनडामध्ये सहा महिन्यांच्या व बारा महिन्यांच्या साडेतीनशेहून अधिक बालकांच्या झोपेचं निरीक्षण करणारा एक अभ्यास झाला.

तसंच 36 महिन्यांचे झाल्यावर त्यांच्या मानसिक व गतिशीलतेच्या कौशल्यांचंही निरीक्षण या अभ्यासात करण्यात आलं. तर, "रात्रभर झोपणं आणि नंतरचा मानसिक विकास यांचा काही विशेष संबंध असल्याचं आढळलं नाही," असं सदर अभ्यासाचे लेखक नमूद करतात. परंतु, रात्रभर झोपण्याच्या सवयीमुळे स्तनपानाचा दर खूपच कमी आल्याचं मात्र दिसून आलं.

रात्री जाग येण्यासारख्या झोपेच्या समस्या कमी करण्यासाठी वर्तनविषयक हस्तक्षेप करण्यात आलेल्या मुलांचा सर्वांत मोठा आणि सर्वाधिक काळ चाललेला एका अभ्यास मध्यंतरी झाला होता. त्यानुसार, या मुलांच्या झोपण्याच्या सवयी, वर्तणूक, भावनिक नियमन किंवा जीवनमान यांमध्ये सहाव्या वर्षी कोणताही फरक आढळला नाही.

काही वेळा झोपेचा अभाव आणि कमकुवत सामाजिक व भावनिक विकास यांच्यात संबंध असल्याचं दिसतं. पण हे निरीक्षण एकंदर कमी झोपेसंदर्भात आहे, अधेमधे उठण्याच्या सवयीशी संबंधित नाही.

पण हा प्रश्न पुन्हा सहसंबंध विरुद्ध कार्यकारणभाव याबाबतीतला आहे. जास्त त्रस्त असलेल्या बाळाला आईवडिलांकडून दिवस-रात्र अधिक शांत करायचे प्रयत्न आवश्यक ठरतात, कारण हे बाळ भावनिक नियमनाच्या बाबतीत अडखळत असण्याची शक्यता असते.

"हे झोपेमुळे होतं की निव्वळ लहान वयातील वागण्याचा हा एक प्रकार आहे, हे आपल्याला माहीत नाही," असं मिंडेल म्हणतात.
झोपेचं नियमन

अनियमित झोपेचं काय? विशिष्ट कालावधीमध्ये झोप अनियमित होते, त्याला 'स्लीप रिग्रेशन' असं म्हणतात. झोपेसंदर्भात सल्ला देणाऱ्या एका संकेतस्थळावर चार महिने, आठ ते दहा महिने, अकरा ते बारा महिने आणि अठरा महिने असा अनियमित झोपेचा कालावधी दिला आहे.

(पण बालकांमध्ये अशी काही लक्षण दिसत असली, तरी 'सहा महिन्यांचा अनियमित झोपेचा कालावधी त्यांच्या बाबतीत येत नाही', अशी उपयुक्त माहितीसुद्धा या संकेतस्थळावर दिली आहे.)

वास्तविक, अशा प्रकारचा अनियमित झोपेचा कालखंड अस्तित्वातच नसतो, असं झोपेविषयीचे संशोधक म्हणतात.

"हा एक गैरसमज आहे. झोपेविषयी प्रचंड मोठी आकडेवारी नि माहिती माझ्याकडे जमवलेली आहे. बालकांच्या पहिल्या दोन वर्षांच्या कालावधीमधील प्रत्येक महिन्याचं निरीक्षण मी केलं आहे आणि अचानकपणे झोपेच्या समस्या वाढल्याचं एकाही महिन्यात आढळत नाही. सर्व वेळ त्यात सातत्य दिसतं. फक्त वेगवेगळ्या बाळांमध्ये वेगवेगळ्या वेळांना काही फरक दिसतात," असं मिंडेल म्हणतात.

सर्वसाधारणतः या 'अनियमितपणा'चा झोपेशी काही संबंध नसतो, तर विकासाच्या इतर रूपांशी संबंधित ही घडामोड असते. रांगणं किंवा चालणं, यांसारखं नवीन कौशल्य शिकताना मुलं उत्साहाने रात्री जास्त जागी राहतात. किंवा यामागे काही मानसिक कारणंही असू शकतात.

"आपल्याला वस्तू दिसत नसल्या किंवा त्यांचे आवाज ऐकू येत नसले तरी त्या आहेत तिथे असतात आणि आपल्या घरातले लोक बाहेरच्या खोलीत गेले तरी ते अस्तित्वात असतात, ही समज बाळात विकसित व्हायला लागलेली असू शकते. अशा वेळी झोपी जाण्याऐवजी घरातल्यांना हाक मारावीशी वाटते," असं ग्रेगरी म्हणतात. (झोपेतील बदलांमागे काही वेळा वैद्यकीय समस्याही असू शकतात. त्यामुळे चिंताजनक बदल वाटला तर डॉक्टरांचा सल्ला घेणं उत्तम, अशी पुष्टी मात्र त्या जोडतात).

बाळं झोपेच्या बाबतीत त्यांची आवड विकसित करत असतात आणि त्यानुसार त्यांना वाढत्या वयासोबत झोपेची सवय लागते, हे खरं असलं तरी, कोणताही झोपेतला बदल 'कायमस्वरूपी' असतो याचा पुरावा नाही.

आशियातील मुलं व पाश्चात्त्य देशांमधील मुलं यांच्यातील झोपेची तुलना करणाऱ्या एका अभ्यासात, मिंडेल यांना असं आढळलं की, बहुतांश वेळा मुलं मोठी होतात तसतसं त्यांना कमी जाग येते. विशेषतः आशियाई देशांमध्ये मुलं आईवडिलांशेजारीच झोपत असण्याची, स्वतंत्र झोपत नसण्याची शक्यता जास्त असते, तिथे हे प्रकर्षाने दिसते.
स्वतंत्रपणे झोपणं

मुलांनी शक्य तितकं स्वतंत्रपणे वेगळं झोपावं, या गृहितकावर झोपेची वेळापत्रकं ठरवली जातात. पण बाळाने एकट्याने झोपणं किंवा झोपून राहणं अवघड असू शकतं. बालकांची मज्जासंस्था पुरेशी विकसित झालेली नसते, त्यामुळे त्यांना भावनिक नियमनासाठी आणि झोपण्यासाठी पुरेसं शांत होण्यासाठी काळजी घेणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहावं लागतं.

आधी उल्लेख आलेल्या 5700 बालकांच्या फिनलँडमधील अभ्यासानुसार, आपली बाळं एकट्याने झोपी जातात, असं अर्ध्याहून कमी पालकांनी सांगितलं. त्याचप्रमाणे, मिंडेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रश्नावलीच्या सहाय्याने केलेल्या एका अभ्यासानुसार, आपली नऊ ते अकरा महिन्यांची बाळं आपापली पलंगात झोपतात, असं 50 टक्क्यांहून थोड्याच अधिक पालकांनी सांगितलं. एक तृतीयांश मुलांना झोपवावं लागत होतं, तर एक चतुर्थांशाहून अधिक मुलांना कडेवर घेऊन झुलवावं लागत होतं.

'स्लीपिंग थ्रू द नाइट' आणि 'टेक चार्ज ऑफ यूअर चाइल्ड्स स्लीप' यांसारख्या पुस्तकांच्या लेखिका असणाऱ्या मिंडेल बाळांना स्वतंत्रपणे झोपायला मदत करणाऱ्या उपायांच्या समर्थक आहेत. परंतु, बाळांना थोपटून शांत केल्यामुळे त्यांच्या विकासात अडथळा होतो, असं मानण्याचं कारण नसल्याचंही त्या सांगतात.

"रात्री वारंवार जागं होणारी मुलं स्वतंत्र कौशल्य विकसित करत नाही, असं आपल्याला वाटतं का?" त्या हसत विचारतात. "नाही. मला वाटतं लोक झोपेवर खूपच जास्त डोकं खर्च करत आहेत. इतरही अनेक गोष्टी होत असतात."

स्वतंत्र झोपेच्या दुसऱ्या टोकाला जवळ-जवळ झोपण्याचाही बालकाच्या विकासाशी गुंतागुंतीचा संबंध असतो. मुलं पालकांच्या शेजारी झोपण्याचा आणि बालकांच्या दीर्घकालीन बोधात्मक व वर्तनात्मक वाढीचा काहीही संबंध नाही, असं काही अभ्यासांमधून निदर्शनास आलं आहे.

पण ब्राझीलमध्ये सुमारे चार हजार तीन महिन्यांच्या बालकांचा एक अभ्यास करण्यात आला, या मुलांचं सहाव्या वर्षांपर्यंत निरीक्षण करण्यात आलं. त्यानुसार, आपल्या आईच्या शेजारी झोपणाऱ्या बालकांमध्ये मानसिक विकास उत्पन्न होण्याची शक्यता जास्त असते. तसंच, शेजारी झोपणं आणि झोपेच्या समस्या यांचाही संबंध आहे.

पण मुळात बाळांना शेजारी का झोपवलं जात होतं, हे या संशोधकांनी पालकांना विचारलंच नाही. ही या अभ्यासांमधील मोठी उणीव आहे. त्यामुळे विशिष्ट तऱ्हेच्या झोपण्याच्या पद्धतीमुळे विशिष्ट प्रकारचा परिणाम होतो का, हे सांगणं अशक्य आहे.

मुलं स्वतःहून शांत होऊन झोपी जात नसतील, म्हणून आईवडिलांनी त्यांना आपल्या पलंगावर घेतलं असेल, तर ते बाळ कसंही झोपलं तरी त्याच्याशी संबंधित दुसऱ्या समस्येचा संदर्भ इथे असू शकतो.

दुसऱ्या बाजूला, मुलांच्या हाकेला ओ देऊन त्यांना आपल्यापाशी झोपायला आणणारे पालक इतर वेळीही प्रतिसाद देणारे असू शकतात, त्यामुळे सुरक्षित नात्याची शक्यता वाढते. दोन्ही बाबतीत, शेजारी झोपणं हा निर्देश करणारा घटक आहे, कारण नव्हे.

त्यामुळे जगातील ज्या भागांमध्ये बाळांना शेजारी घेऊन झोपणं हाच नियम आहे, तिथे हे भेद दिसत नाहीत, कारण पालक एखाद्या समस्येला प्रतिसाद म्हणून तसं करत नसतात.

या भेदाचा आढावा घेणाऱ्या एकमेव अभ्यासात असं आढळलं की, बाळ असल्यापासून आईवडिलांशेजारी झोपणारी शालेय वयापेक्षा लहान मुलं अधिक स्वावलंबी आणि सामाजिकदृष्ट्या अधिक स्वतंत्र होती.
झोपेच्या समस्या

मुलं कितीही वेळा जागी झाली किंवा त्यांना एकटं झोपायचं नसेल, तरी आपल्या मुलांची झोप पुरेशी नाहीये, अशी चिंता पालकांना कायमच वाटत असते. फिनलँडमधील उपरोक्त अभ्यासात आठ महिने वयाच्या बालकांच्या सुमारे 40 टक्के पालकांना त्यांच्या पाल्याला झोपेच्या समस्या आहेत, असं वाटत होतं.

मग झोपेसंबंधीच्या संशोधकांच्या दृष्टीने 'झोपेची समस्या' म्हणजे काय असतं?

"याबाबतीत कोणतीही सर्वस्वीकृत किंवा मोजमाप करून तयार झालेली काटेकोर व्याख्या नाही," असं हिस्कॉक सांगतात. "पण पालकांना ती समस्या आहे असं वाटत असेल, तर पहिला पाऊल म्हणजे त्या समस्येबाबत आपण काही पाऊल उचलायला हवं."

काही वेळा योग्य माहिती देणं, असा यावरचा सरळ उपाय असू शकतो, असं हिस्कॉक म्हणतात. "आपल्या तीन महिन्यांच्या बाळाला रात्री दूध पिण्यासाठी दोनदा जाग येते, त्यातून थकवा येतो, असं कोणी पालक म्हणत असतील, तर हे अगदी सर्वसामान्य वागणं आहे, असं म्हणता येईल."

आपलं बाळ इतर अनेक बाळांसारखं वागत असतानाही त्याला काहीतरी समस्या आहे, असं वाटण्याने समस्या आणखी गुंतागुंतीची होऊ शकते, त्यातून ताण व चिंताग्रस्तता वाढू शकते, हे समजून घेणं आवश्यक आहे. आपल्या बाळाला झोपेची समस्या आहे, असं वाटणारे पालक बाळावर संतापण्याची शक्यता जास्त असते आणि त्यांना स्वतःच्या पालकत्वाबाबत कमी आत्मविश्वास वाटत असतो.

आपल्या सांस्कृतिक अपेक्षांमुळेही आपल्याला विशिष्ट वर्तन समस्याग्रस्त आहे असं वाटू शकतं. एका मोठ्या अभ्यासात मिंडेल यांना असं आढळलं की, या समस्यांविषयी पालकांचा समज देशा-देशानुसार प्रचंड वेगळा राहतो. व्हिएतनाममध्ये केवळ 10.1 टक्के पालकांना त्यांच्या बाळाला झोपेची समस्या आहे असं वाटत होतं, तर चीनमध्ये 75.9 टक्के पालकांना तसं वाटत होतं.

"बाळांना झोपेची समस्या आहे, ही सगळी कल्पनाच मुळात मनोविकार निर्माण करणारी ठरते आहे, असं मला वाटतं. आपल्या बाळाबाबतीत काहीतरी चुकीचं घडतंय, असं पालकांना वाटत राहतं. हीच एक समस्या आहे. वास्तविक ते मूल त्याच्या वयाच्या हिशेबाने वागत असतं," असं बॉल म्हणतात.
या गैरसमजाचा उगम

अनेक पालक बालकांच्या झोपेच्या मुद्द्याने पछाडलेले असले, तरी त्यातील बहुतेकसे समज चुकीचे असल्याचं दिसतं. हे कसं? बीबीसी फ्यूचरवर पूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका लेखानुसार, सांस्कृतिक मूल्य, गृहितकं व विचारसरण्या यांचा बालकांच्या झोपेशी जास्त संबंध असतो, विज्ञानाचा संबंध कमी असतो.

सुरक्षितरित्या सोबत झोपण्याचे समर्थक असणारे मानवशास्त्रज्ञ मॅककेना यांच्या मते, अनेक शतकं असं झोपणं केवळ सर्रास आढळत होतं इतकंच नव्हे तर बालकांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत झोपणं आवश्यक

मानलं जात होतं. वीज वा उबदारपणासाठीची उपकरणं नसल्यामुळे मातांच्या जवळ झोपणं सोयीचं, सुरक्षित आणि स्तनपानासाठी सुकर ठरणारं होतं. बहुतांश संस्कृतींमध्ये हीच पद्धत सुरू आहे.

"एकोणिसाव्या शतकापूर्वी पालकांना त्यांच्या बालकांना झोपेची समस्या आहे अशी काही चिंता फारशी सतावत नसायची. या विषयावरच्या तत्कालीन सल्ला-पुस्तकांमध्येही याबद्दल काही उल्लेख आढळत नाही," असं मानवशास्त्रज्ञ जेनिफर जी. रोझिअर व ट्रेसी कॅसल्स लिहितात.

"एखादं बाळ जागं होत असे, तेव्हा कुटुंबातलं कोणीतरी त्याची वा तिची काळजी घेण्यासाठी जागं असायचंच, किंवा शेजारी झोपलेलं कोणीतरी बालकाच्या गरजांना तत्काळ प्रतिसाद द्यायचं. शिवाय, बाळांना व प्रौढांना गरज असते तेव्हा ते झोपतात आणि गरज असते तेव्हा जागे राहतात, अशीही समजूत प्रचलित होती."

एकोणिसाव्या शतकारंभापासून औद्योगिक क्रांतीच पडघम वाजू लागले, मध्यम वर्ग वाढीला लागला आणि स्वातंत्र्यावर नव्याने भर दिला जाऊ लागला. दिवसाचा जास्त वेळ काम करावं लागल्यामुळे रात्री अखंड झोपण्यात जास्त रस घेतला जाऊ लागला.

नागरीकरणही वाढलं, त्यामुळे आपल्या कुटुंबांपासून दूर राहणाऱ्या पालकांना काटेकोरपणे झोपेची वेळापत्रकं गरजेची वाटू लागली आणि मुलं एकट्याने झोपली तर ती स्वतंत्र व समर्थ होतील, असाही समज दृढमूल झाला."

हे अर्थातच सर्वत्र असं झालं नाही. "अमेरिकी संस्कृती लहान मुलांना रात्रीच्या वेळी अशा स्वातंत्र्यामध्ये निष्ठूरपणे ढकलते आहे, असं जपान्यांना वाटतं," असं एक संशोधक सांगतात. ग्वाटेमालामध्ये माया समुदायातील मातांना अमेरिकेतील झोपेच्या पद्धतींची माहिती कळल्यावर त्यांना "धक्का बसला, त्यांनी असहमतीही व्यक्त केली आणि अमेरिकी मुलांची त्यांना दया वाटली."

आज अनेक थकलेल्या पालकांना मुलांच्या झोपेविषयीच्या पुस्तकांमधून किंवा झोपेबद्दल सल्ला देणाऱ्या प्रशिक्षकांकडून माहिती मिळते. अमेरिकेबाहेरसुद्धा अशा पुस्तकांना व प्रशिक्षकांना लोकप्रियता लाभते आहे. पण अनेक पुस्तकं पुराव्यावर आधारीत नसतात आणि झोपेच्या प्रशिक्षणाचा उद्योग अनिर्बंध आहे. अखेरीस, कोणीही स्वतःला झोपेतील तज्ज्ञ म्हणून शकतं.

दरम्यान, आरोग्य सेवेतील व्यावसायिकांनासुद्धा बालकांच्या झोपेबाबत पुरेसं प्रशिक्षण मिळालेलं नसतं. अमेरिकेतील 126 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मुलांच्या झोपेसंदर्भात केवळ 27 मिनिटं प्रशिक्षण मिळतं, असं एका अभ्यासात आढळलं. कॅनडातील आरोग्यसेवादात्यांच्या एका सर्वेक्षणानुसार, केवळ 1 टक्के विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयात बालकांच्या झोपेविषयी काही प्रशिक्षण मिळालं होतं.

ऑस्ट्रेलियातील 263 डॉक्टरांच्या एका सर्वेक्षणानुसार, बालकांच्या झोपेविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नांपैकी अर्ध्याहून कमी प्रश्नांची उत्तरं या डॉक्टरांना देता आली. इतर देशांच्या तुलनेत या देशांमध्ये झोपेविषयीच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं जातं, हे विशेष!

या सगळ्याचं सार काय? बाळांच्या झोपेविषयीची सर्वांत मोठी, सर्वांत धोकादायक गैरसमजूत साधीच आहे: बाळांनी कसं झोपावं, याबाबत एकचएक अचूक दृष्टिकोन आहे, ही ती समजूत होय.

"भिन्न कुटुंबांच्या भिन्न गरजा व प्राधान्यक्रम असतात आणि त्यांचे बालकांच्या झोपेविषयीचे दृष्टिकोनही भिन्न असतात," असं ग्रेगरी म्हणतात.

"या निर्णयांमध्ये सुरक्षिततेचा विचार मध्यवर्ती ठेवला, तर सगळं ठीक आहे- बाळाला झोपेत अचानक मृत्यू ओढवणार नाही, यासाठी पालकांनी काळजी घेणं, हेही तितकंच महत्त्वाचं आहे."

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info