बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी?pregnancytips.in

Posted on Sun 16th Jan 2022 : 23:07

अशी घ्या बाळ व बाळंतिणीची काळजी
sakal_logo
By
डॉ. सुषमा देशमुख
Published on : 9 September 2020 at 1:02 pm
sakal

निलाताईच्या सुनेची मीताची प्रसूती अगदी व्यवस्थित, नॉर्मल झाली होती. (बाळ, बाळंतिण दोघेही मजेत होते). पण बाळाला बघायला एकच गर्दी झाली. त्याचे फोटो काढणे, कौतुक करणे चालू झाले. सगळयांना समजाऊन बाळ व बाळंतिणीला विश्रांतीची गरज आहे म्हणून सांगितले. सुटी झाल्यावर पंधरा दिवसांनी जेव्हा मीता फेरतपासणीस आली तर चेहरा सुकलेला होता. मीताची आई जुन्या विचारांची होती. सगळे खायला द्या म्हणून सांगितल्यावरसुद्धा त्यांचे पथ्य पाणी चालू झाले. परिणाम असा झाला की मीताला दूध येणे कमी झाले. मग मात्र मी तिचे पती, आई, सासु सगळ्यांना बोलावून तिच्या जेवणाचे वेळापत्रक व बाळाची काळजी याची माहिती दिली.
गरोदरपण, बाळ याबाबत आपण खूप विचार करतो, वाचतो पण बाळंतपणानंतर बाळाबरोबर, बाळंतिणीचीसुद्धा कधी काळजी घ्यायची, याविषयी देखील माहिती करून घेणे गरजेचे आहे.
आमच्या वैद्यकीय भाषेप्रमाणे आम्ही बाळंतपणानंतरच्या काळाला Puerperium म्हणतो. हा साधारणतः दीड महिन्याचा कालावधी असतो. या कालावधीमध्ये गरोदरपणाच्या नऊ महिन्यांमध्ये स्त्रीमध्ये जे शारिरीक (Anatomical, physiological) बदल होतात ते परत पूर्वावस्थेत येतात. फक्त स्तनपानामुळे स्तनांचे आकारमान वाढते व बाळंतिणीमध्ये मानसिक बदल होतात.
बाळंतिणीची काळजी
आराम व विश्रांती
प्रसूती झाल्यानंतर बाळंतिणीला विश्रांतीची अतिशय गरज असते. अशा वेळेस तिला शांतता मिळणे आवश्यक आहे. प्रथम मातांना बऱ्याच गोष्टी माहित नसतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नवजात बाळाची जबाबदारी. आधीच प्रसूतीमुळे माता थकलेली असते. बाळाच्या उठण्या-झोपण्याच्या वेळा तिला त्रासदायक होतात. त्यात तिला दर दोन-तीन तासांनी स्तनपान करावे लागते. बहुतांशी बाळं रात्री जागी असतात व दिवसा झोपतात. बाळांना नवीन जगाशी जुळवून घ्यावे लागते. बरीच बाळे खुप रडतात, काही बाळं स्तनपान नीट करीत नाहीत. अशा वेळी माता खुप त्रासून जाते. आम्ही तसेही बाळंतिणीला बाळाबरोबरच झोपण्या-उठण्यास सांगतो. त्यामुळे तिला विश्रांती मिळते. तसेच या काळात बाळाला सांभाळण्यासाठी कुणीतरी अनुभवी, खंबीर व्यक्ती असावी. आम्ही नेहमीच मातेची सासु व आई किंवा इतर अनुभवी स्त्रीला तिला आधार देण्यास सांगतो आणि त्यासाठी पेशंटची माता व सासु यांच्यामध्ये सामंजस्य असावे. आजकाल बाळाचे पिता पण नवीन बाळाला छान सांभाळतात. प्रसूतीनंतर कमीतकमी एक ते दीड महिना विश्रांती घेतलीच पाहिजे. आजकाल नोकऱ्यांमध्ये पण मॅटर्निटी लीव्ह मिळते. या दिवसांत स्वतःची काळजी, बाळाची काळजी, खाणे-पिणे याबरोबरच लोह व कॅल्शिअमच्या गोळ्या डॉक्टरी सल्ल्याप्रमाणे चालू ठेवाव्यात.
पोषण व योग्य आहार
बाळंतिणीला विशेष पौष्टिक आहाराची गरज असते. आम्ही नेहमी बाळंतिणीला जेवणाचे वेळापत्रक बनवून देतो. बाळाने रात्री कितीही जागवले तरी सकाळी सात पासून तिचा खुराक चालु करावा. दिवसातुन पाच ते सहा वेळा तिला पौष्टिक आहार मिळाला पाहिजे. कुठलेही पथ्य करू नये. आहारात हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, वरण (वाटीभर) भात, भाजी पोळी, सॅलड, फळे विशेषतः पपई, याशिवाय अंडी, आळीवाची-नाचणीची खीर, डिंकाचे-मेथीचे लाडू, शेवग्याच्या शेंगाचे सुप, चिकन-मटन व इतर भाज्यांचे सुप यांचा समावेश करावा. तेला-तुपाचा अति वापर करू नये.
बाळंतिणीची हॉस्पिटलमधील खोली
आजच्या या संगणक युगात प्रसुती झाल्याबरोबर, बाळ-बाळंतिणीचे फोटो काढणे, याशिवाय बाळंतिणीला एकसारखे मोबाईल फोनवर अभिनंदनाच्या वर्षावाला तोंड द्यावे लागते. तिचा, बाळाचा कुणीच विचार करत नाही. बऱ्याचदा मातांचे स्तनपान करतानासुद्धा एका हातात मोबाईलवर बोलणे चालूच असते. यावर कुठेतरी नियंत्रण आलेच पाहिजे.
Visitors
बाळ-बाळंतिणीला भेटायला जाणे शक्यतो टाळावे. तिच्या पतीला, आई-वडिलांना शुभेच्छा द्याव्यात. किंवा ग्रिटींगकार्डच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त करावे. कारण नुकतेच जन्मलेले बाळ व बाळंतिण यांची अवस्था नाजूक असते, कुठलेही इन्फेक्शन किंवा जंतूंचा संसर्ग त्यांना होण्याची शक्यता जास्त असते.
बाळंतिणीची घरातील खोली
बाळंतिणीला घरी नेण्यापूर्वी बाळंतिणीची खोली स्वच्छ धुऊन तयार करावी. खोलीत पुरेसा सुर्यप्रकाश, हवा आली पाहिजे. पडदे, बेडशीट स्वच्छ असावे. दुपटे, लंगोट ठेवण्यासाठी आजकाल छान स्टॅंड मिळतात. बाळाचे सगळे कपडे स्वच्छ धुऊन वापरावे.
स्तनपान
बाळंतपणानंतरचा हा महत्त्वाचा भाग आहे. बाळंतिणीला एकांत व शांतता मिळणे आवश्यक आहे. स्तनपानासाठी मानसिक व शारिरीकरीत्या ती तयार असावी व प्रत्येक मातेला स्तनपानाचे महत्त्व माहिती असावे.
व्यक्तिगत स्वच्छता
जर प्रसूती नॉर्मल असेल तर रोज स्नान करण्यास काहीच हरकत नाही. त्याचप्रमाणे योनीमार्गाची स्वच्छता ही आवश्यक आहे. त्या जागेवर टाके असतील तर ती जागा लघवी शौचानंतर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. सिझेरियन असेल तर शक्यतो टाके ओले न होऊ देता चौथ्या, पाचव्या दिवसानंतर स्नान करता येते. लघवी व शौचास वेळेवर जाण्याचा प्रयत्न करावा. पाणी भरपूर प्यावे. फळे व पालेभाज्या भरपूर प्रमाणात घ्याव्यात म्हणजे शौचास त्रास होत नाही. बाळंतिणीला तिळ, नारळ किंवा ऑलिव्ह तेलाने मालिश करण्याची पद्धत आहे. त्यामुळे बाळंतिणीचा थकवा, ताण कमी होण्यास मदत होते. मालिशमुळे छान झोप लागते. पण बाळाच्या मालिशबाबतीत नेहमीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
व्यायाम
प्रसूतीनंतर थोडासा आराम केल्यानंतर झोपलेल्या अवस्थेतच हातपाय हलवावेत, खोल श्वास घ्यावा व सोडावा. त्याचप्रमाणे योग्यरितीने उठणे, बसणे हे देखील महत्त्वाचे आहे. सर्वकाही डॉक्टरांना विचारूनच करावे. बाकीचे व्यायाम हे प्रसूतीनंतर तीन महिन्यांनी चालू करावेत.
बाळाची काळजी
तुमच्या या चिमुकल्या जिवाने या जगात नुकताच प्रवेश केलेला असतो. त्याला लागणारे मातेचे दूध हे ईश्वरानेच मातेला प्रदान केले असते. पण त्याबरोबरच त्याची काळजी, स्वच्छता, लसीकरण या अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत. त्याबाबतीत बालरोगतज्ज्ञांचा सल्ला पहिल्यापासूनच घ्यावा.
.मानसिक काळजी
बऱ्याच माता प्रसूतीचा ताण सहन करू शकत नाहीत. किंवा ज्या मातांची बाळे अतिदक्षता विभागात असतात त्यांना खुप जपावे लागते. घरगुती कलहाचा बाळंतिणीला त्रास होऊ देऊ नये. कारण काही वेळा मानसिक रोगतज्ञांची मदत घ्यावी लागते.
थोडक्यात
बाळंतपणानंतरचा काळ (Puerperium) हा साधारणतः दीड महिन्याचा असतो. हा कालावधी बाळ व बाळंतिणीसाठी महत्त्वाचा आहे.
* योग्य, चौरस व सकस आहार यावर बाळ व बाळंतिणीचे आरोग्य अवलंबून आहे.
* कमीतकमी दीड महिना बाळंतिणीने विश्रांती घेतलीच पाहिजे. तिचा आहार व स्तनपान या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या काळातच माता व बालक यांचे नाते सर्वार्थाने दृढ होते. मानसिक व शारिरीक आराम अतिशय महत्त्वाचा आहे. लॅपटॉप, मोबाईल, इंटरनेट, टीव्ही या सर्व उपकरणांपासून पूर्णपणे दूर रहावे.
* बाळंतिणीची व्यक्तिगत स्वच्छता, डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे हलकासा व्यायाम या बाबींकडे लक्ष असावे.
* प्रत्येक गोष्टीची जर व्यवस्थित आखणी असेल, तर तुम्ही तुमच्या नवजात बालकासोबत मनमुराद आनंद लुटू शकाल!

solved 5
wordpress 2 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info